Join us

आता प्रत्येक टी२० सामना महत्त्वाचा

भारतात यंदाच्या मोसमातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न टाकता रद्द होणे लाजिरवाणी बाब आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:17 IST

Open in App

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...भारतात यंदाच्या मोसमातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न टाकता रद्द होणे लाजिरवाणी बाब आहे. पावसामुळे सामना रद्द झाला असता, तर अधिक दु:ख झाले नसते. मानवी चुकांमुळे ही लढत रद्द झाल्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांना निराश होऊन परतावे लागले.आजच्या युगात दर्जेदार पायाभूत सुविधांबाबत चर्चा होत असताना व पुरेशी आर्थिक मदत उपलब्ध असताना खेळपट्टीवर झाकण्यासाठी दर्जेदार कव्हर नाहीत, याची कल्पनाही करता येत नाही. दर्जेदार कव्हर नसल्यामुळे खेळपट्टीवर पावसाच्या पाण्यामुळे स्पॉट निर्माण झाले होते. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. या घटनेपासून अन्य संघटनासुद्धा बोध घेतील आणि भविष्यात अशी घटना घडणार नाही, अशी आशा आहे.आॅस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या यंदाच्या वर्षातील टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आगामी काही महिन्यांमध्ये खेळल्या जाणाºया लढती महत्त्वाच्या आहेत. रद्द झालेला टी२० सामना म्हणजे शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यासारख्या नवोदित खेळाडूंसाठी वाया गेलेली संधी आहे. तीच बाब अनुभवी शिखर धवनसाठी लागू होते. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाºया आक्रमक फलंदाज धवनची सलामीला रोहित शर्माचा सहकारी म्हणून फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलसोबत स्पर्धा आहे.त्याचप्रमाणे पुनरागमनासाठी उत्सुक असलेला वेगवान गोलंदाज बुमराह यालाही आणखी एका सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुमराहवर पूर्वीप्रमाणेच निर्णायक क्षणी भारतीय संघाला यश मिळवून देण्याची जबाबदारी राहील. भारतीय गोलंदाजीमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिला सामना रद्द झालेला असल्याने आता ही दोन लढतींची मालिका झाली आहे. भारतीय संघ नव्या मोसमात शानदार विजयाने सुरुवात करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे, पण मलिंगा अ‍ॅण्ड कंपनीविरुद्ध ही बाब सोपी नाही.