Join us  

"आता चेंडू सांभाळणे सर्वात मोठे आव्हान; ते कसोटी सामन्यात अधिक राहील"

नितीन मेनन : अंपायर्सनाही सामजिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:44 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनलमधील सर्वात युवा सदस्य नितीन मेनन अ‍ॅशेस मालिकेला सर्वांत आव्हान मानतात, पण त्यांच्या मते सध्याच्या स्थितीत सर्वांत मोठे आव्हान हे आहे की खेळाडूंनी मुद्दाम किंवा अजाणतेपणी चेंडूला लाळ लावायला नको, हे निश्चित करणे आहे.

२२ व्या वर्षी क्रिकेट खेळणे सोडणारे ३६ वर्षीय मेनन त्यानंतर अंपायरिंगसोबत जुळले. पंचगिरीमध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आहेत. मेनन यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि सोमवारी १२ सदस्यांच्या एलिट पॅनलमधील त्यांचा समावेश सर्वांत महत्त्वाचा क्षण ठरला. कोविड-१९ महामारीदरम्यान एलिट पॅनलचे सदस्य झालेल्या मेनन यांना पंचगिरीची केव्हा संधी मिळेल, याची कल्पना नाही, पण आयसीसीचे सध्याचे दिशानिर्देश लागू करणे सर्वात मोठे आव्हान असल्याची त्यांना कल्पना आहे. मेनन म्हणाले, ‘मुख्य आव्हान चेंडू सांभाळण्याचे राहील. हे आव्हान कसोटी सामन्यात अधिक राहील. सुरुवातीला नियमांचा अवलंब करण्यापूर्वी आम्ही खेळाडूंना ताकीद देणार आहोत. सर्वसाधारणपणे आम्ही जर एखादा खेळाडू धोकादायकपणे खेळपट्टीवर धावत असेल तर त्याला आम्ही सुरुवातीला ताकीद देतो. त्याचप्रमाणे लाळचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्या खेळाडूला सुरुवातीला ताकीद देऊ.’

परिस्थिती सुरळीत झाली तर मेनन इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या ऐतिहासिक अ‍ॅशेस मालिकेचा भाग होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे प्रवासाबाबत निर्बंध बघता आयसीसीने निर्णय घेतला आहे की, मालिकेत केवळ स्थानिक पंच अंपायरिंग करतील. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर सराव सुरू करण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला ज्याप्रकारे विलगीकरणात राहावे लागले त्याप्रमाणेच पंचांनाही त्याच पद्धतीचा अवलंब करावा लागेल आणि त्याचा पंचांच्या मानसिकतेवर प्रभाव होईल, असे मेनन यांना वाटते. मेनन पुढे म्हणाले, ‘पंचांनाही सामजिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करावे लागेल आणि त्याशिवाय आता त्यांना मैदानावर खेळाडूंच्या वैयक्तिक वस्तू सांभाळाव्या लागणार नाही. ग्लोव्हजचा वापर करणे पंचाच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून राहील, पण आम्ही आपल्या खिशात सॅनिटायझर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’

३ कसोटी सामन्यांसह ४३ आंतररष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करणारे मेनन पुढे म्हणाले, ‘भारत नियमितपणे जागतिक दर्जाचे पंच तयार करण्यात अपयशी ठरला आहे, पण आता परिस्थिती सुधारत आहे.’ ‘मी अ‍ॅशेसमध्ये अंपायरिंग करण्याचे स्वप्न बघितले आहे, यात कुठली शंका नाही. ही एकमेव मालिका मी टीव्हीवर बघतो. येथील माहोल आणि ज्याप्रकारे मालिका खेळली जाते त्याचा भाग होण्यास इच्छुक आहे. मालिका इंग्लंडमध्ये असो किंवा आॅस्ट्रेलियात असो, पण याचा भाग होणे मला आवडेल आणि विश्वकप स्पर्धेत अंपायरिंग करण्याचे स्वप्न आहे. मग तो टी-२० असो किंवा वन-डे आंतरराष्ट्रीय असो.’- नितीन मेनन

टॅग्स :भारत