Join us  

क्रिकेट नव्हे तर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, 'दादा'ची फटकेबाजी

भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय पटेल यांच्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडण्याची मागणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:59 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय पटेल यांच्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडण्याची मागणी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात पाकिस्ताविरुद्ध संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. भज्जीनेही हेच मत व्यक्त केले आणि गांगुलीने त्याला सहमती दिली.

गांगुली म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्ध न खेळल्यानं भारताला फार फरक पडणार नाही.'' मात्र, भारताने साखळी फेरीतील सामन्यावर बहिष्कार घालावा की उपांत्य-फेरी किंवा अंतिम फेरीत समोरासमोर आल्यास खेळण्यास नकार द्यावा, याबाबत गांगुलीनं त्याची भूमिका स्पष्ट केली नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. पण, भारताने पाकिस्तानविरुद्धचा एक सामना खेळला नाही, तर फार फरक पडणार नाही. भारतीय संघाशिवाय वर्ल्ड कप घेणं आयसीसीला सोपं जाणार नाही. पण, पाकिस्तानमध्ये कठोर संदेश जाणं गरजेचं आहे.'' 

गांगुली पुढे म्हणाला,''भारताला पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत. देशवासीयांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या रास्त आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर द्विदेशीय मालिका होण्याची शक्यता मावळली आहेच. केवळ क्रिकेटच नव्हे तर हॉकी, फुटबॉल आदी सर्व खेळांमधले संबंध तोडायला हवेत.''  

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले होते. हरभजनने तर भारताने पाकिस्तानबरोबर वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांनी हरभजनच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर देशापेक्षा खेळ कधीच मोठा होऊ शकत नाही, असे विधानही केले आहे. संजय पटेल यांनी सांगितले की, " भारतामध्ये एवढा भयावह हल्ला झाला आहे. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानशी कसे खेळू शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मला वाटते की, आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तानबरोबर खेळू नये."

 

टॅग्स :सौरभ गांगुलीपुलवामा दहशतवादी हल्लाबीसीसीआयहरभजन सिंग