Noman Ali Hat trick Pakistan, PAK vs WI 2nd Test : पाकिस्तानी क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून खराब कामगिरीमुळे ट्रोल होताना दिसत होता. त्यांच्या स्वतःच्याच घरात बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाने म्हणावी तशी उभारी घेतली नव्हती. पण आता हळूहळू पाकिस्तानचे क्रिकेट पूर्वपदावर येत असून वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. पाकिस्तानची वेस्टइंडीज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना जिंकून पाकिस्तान १-०ने आघाडीवर आहे. आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. यात पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अली याने हॅटट्रिक घेत इतिहास रचला. (FIRST PAKISTAN SPINNER TO TAKE A TEST HAT-TRICK)
नोमान अली पहिला पाकिस्तानी फिरकीपटू
पाकिस्तानी संघ मालिकेत आघाडीवर असताना दुसऱ्या कसोटीत वेस्टइंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर ब्रेथवेट आणि लुईस हे स्वस्तात माघारी परतले. पाठोपाठ अमीर आणि अथानाझे देखील झटपट बाद झाले. यानंतर पाकिस्तानी फिरकीपटूने ऐतिहासिक कामगिरी केली. डावाच्या बाराव्या शतकात नोमान अलीने पहिल्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हज, दुसऱ्या चेंडूवर तेवीन इमलाच आणि तिसऱ्या चेंडूवर केविन सिनक्लेयर यांच्या विकेट्स घेत हॅटट्रिक मिळवली. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये कसोटीत फिरकीपटूने हॅट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पाहा हॅटट्रिकचा व्हिडीओ-
कसोटी क्रिकेटमधील पाकिस्तानचे आतापर्यंतचे हॅटट्रिकवीर
पाकिस्तानी संघाकडून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांनीच हॅटट्रिकचा मान मिळवला होता. यात १९९८-९९ मध्ये वसीम अक्रमने श्रीलंकेविरुद्ध सलग दोन वेळा हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर १९९९-२००० मध्ये अब्दुल रझाकने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक मिळवली होती. त्यानंतर २००१-०२ मध्ये मोहम्मद सामी यानेही श्रीलंकेविरुद्धच हॅटट्रिक घेतली होती. तर २०२० मध्ये नसीम शाह याने बांगलादेश विरुद्ध हॅटट्रिकचा मान मिळवला होता. त्यानंतर आज नोमान अली याने हॅटट्रिक घेत या यादीत स्थान मिळवले.