Join us  

यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारताला आता कोणीच रोखू शकत नाही - शोएब अख्तर

विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने विविध बाबींवर प्रकाश टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 2:23 PM

Open in App

ICC World Cup 2023 : भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजयाचा 'पंच' लगावल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने टीम इंडियाचे कौतुक केले. विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने विविध बाबींवर प्रकाश टाकला. कठीण खेळपट्टीवर किंग कोहलीने ९५ धावांची अप्रतिम खेळी केली आणि भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. खरं तर तब्बल २० वर्षांनंतर भारताने आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले आहे. धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून भारताने क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. 

विराट कोहली पाच धावांनी शतकाला मुकला अन् महान सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्यापासून दूर राहिला. विराटने आतापर्यंत वन डेत ४८ शतके झळकावली आहेत. तर, वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक (४९) शतके झळकावणारा खेळाडू म्हणून सचिनची नोंद आहे. 'विराट' कौतुक करताना अख्तरने म्हटले, "विराट कोहली दबावाच्या स्थितीत चांगला खेळतो किंबहुना दबावामुळेच त्याला मोठ्या खेळीची संधी मिळते. विराटला ४९वे शतक झळकावण्याची चांगली संधी होती पण दुर्दैवाने असे झाले नाही. रोहित-गिल यांनीही चांगली सुरूवात केली. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांना विराटची साथ देता आली नाही. पण रवींद्र जडेजाने ते काम चोखपणे पार पाडले. सगळ्यांना माहिती आहे की, विराटने काय केले पण त्यासाठी राहुलने देखील दबाव झेलला हे विसरून चालणार नाही."

अख्तरकडून भारतीय संघाचे कौतुक तसेच मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी करून पाच बळी घेतले. भारतीय संघ सांघिक खेळी करत आहे त्यामुळे यंदाचा विश्वचषक त्यांचाच असल्याचा भास सर्वांना होतोय. पण, रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडला ३००-३५० धावा करता आल्या असत्या. मात्र, शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् न्यूझीलंडचा संघ ३०० च्या आतच आटोपला. शमीने भारतीय संघात आपली जागा निश्चित केल्याचे मला दिसते. मला वाटते की, भारताला यंदाचा विश्वचषक जिंकण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, असेही शोएब अख्तरने नमूद केले. दरम्यान, भारताचा आगामी सामना गतविजेत्या इंग्लंडसोबत २९ ऑक्टोबर रोजी लखनौमधील एकाना स्टेडियमवर होणार आहे. 

भारताचा 'विराट' विजय २० वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने अखेर न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने चांगली सुरूवात केली. पण, डॅरिल मिशेल (१३०) आणि रचिन रवींद्र (७५) यांनी यजमानांची डोकेदुखी वाढवली. अखेर निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा करून किवींनी भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक सुरूवात केली. रोहित शर्मा (४६) आणि शुबमन गिल (२६) धावा करून तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. त्याला श्रेयस अय्यरने (३३) चांगली साथ दिली. मात्र, अय्यर बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा नाबाद ३९ धावांची खेळी करून अखेरपर्यंत टिकून राहिला. सामन्याचा हिरो विराट कोहली मात्र त्याच्या शतकाला मुकला आणि (९५) धावांवर बाद झाला अन् 'विराट' खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी आणि १२ चेंडू राखून विजय साकारला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशोएब अख्तरभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ