Join us

रोहित शर्माच्या विंडीज दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती; चेतेश्वर पुजाराला शेवटची संधी पण... 

IND vs WI Series : भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:37 IST

Open in App

IND vs WI Series : भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला विश्रांती देणार असल्याची चर्चा होती. पण, रोहितला कसोटी मालिकेत विश्रांती मिळणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीतून सावरत असलेले खेळाडू वेस्ट इंडिज मालिकेत खेळणार नाहीत. दरम्यान, चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होतेय.

पुजारा कसोटी संघात असला तरी निवड समिती दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सर्फराज खानची निवड करू शकतात. रणजी करंडक स्पर्धेत सर्फराजने धावांची रतीब घातला आहे आणि कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. त्याची विंडीज दौऱ्यासाठी निवड झाली, तरी अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे अवघड आहे. ''रोहित तंदुरुस्त आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याला पुरेशी विश्रांती  मिळालेली असेल... त्यामुळे वर्क लोडचा मुद्दाच येत नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तोच नेतृत्व करेल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमधून विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे विंडीज कसोटी मालिकेसाठी नेतृत्व सोपवले जाईल, असेही म्हटले जात होते. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर असल्याने रोहितला विंडीज दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका वगळल्यास कसोटी व वन डे मालिकेत खेळावे लागेल. त्याने वन डे क्रिकेटमध्ये मागील १२ महिन्यांत ४९.२७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.  

दरम्यान, विंडीज दौऱ्यासाठी संघ निवडीसाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघाला विंडीज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. रोहित व विराट कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीवर आहेत आणि ते तिथून वेस्ट इंडिजला दाखल होतील. रोहित शर्मा कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व करेल. रोहित व विराट यांना ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली जाईल. हार्दिक पांड्या या मालिकेत नेतृत्व करेल. शुबमन गिल यालाही वर्क लोड मॅनेज करण्यासाठी ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली जाईल.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीहार्दिक पांड्या
Open in App