रांची : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, अष्टपैलू कामगिरी करून भारताला विजयाची स्वप्ने दाखवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने हा पराभव गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. इतर सामन्यांप्रमाणेच हा सामना होता. प्रत्येकच वेळी निकाल तुमच्या मनासारखा लागत नाही. त्यामुळे पराभवाचा जास्त विचार न करता मालिकेत पुनरागमनासाठी भारतीय संघ कटिबद्ध असल्याचे सुंदर म्हणाला.
पहिला सामना गमावल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर पडला आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने २ बळी आणि २८ चेंडूंत ५० धावा करत अष्टपैलू कामगिरी केली. मात्र, भारताला विजयी करण्यासाठी त्याला इतरांची साथ लाभली नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुंदर म्हणाला, मला वाटतं की हा फक्त एक सामना होता. त्यामुळे लगेच खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी होती किंवा आम्हाला या विभागात चांगली कामगीरी करावी लागेल अशी कारणे मी समोर करणार नाही. अन्य सामन्यांप्रमाणे हासुद्धा एक सामना होता. कदाचित पुढच्या सामन्यात आमचा संघ जोरदार पुनरागमन करेल आणि या सामन्याची चर्चाही होणार नाही.
रांचीची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी ठरली. कारण दोन्ही संघांतील फिरकी गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. याबाबत सुंदर म्हणाला, वेगवान सुरुवात करण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र, न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. खासकरून सँटनरला खेळणे सोपे नव्हते. आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यांची पूर्ण जाण आहे. त्यानुसारच किवींनी रणनीती आखली असावी.
प्रत्येकच वेळी बदल गरजेचा नसतो
भारतीय संघात बदल करण्याची गरज आहे का, असा प्रश्न विचारल्यावर सुंदर म्हणाला, जर कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला आवडीची बिर्याणी मिळाली नाही तर तुम्ही हॉटेलमध्ये जाणे बंद कराल का, तर नाही. त्यामुळे लगेच एक निकाल मनासारखा लागला नाही म्हणून संघ बदलणे हे मला पटत नाही. सर्वच खेळाडू कर्तृत्ववान आहेत. केवळ एक दिवस धावा केल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्या भूतकाळातील कामगिरी कमी लेखू शकत नाही. हा एक खेळ आहे. यामध्ये प्रत्येक दिवस मनाप्रमाणे नसतो. सर्वांनीच संयम राखणे गरजेचा आहे. तेव्हाच कुठे विजयी रथावर स्वार होता येईल.