Join us

तुम्ही कितीही शतकं ठोका, पण...; रोहित शर्मा नेमकं कोणाला उद्देशून बोलून गेला..?

टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाची धुरादेखील रोहित शर्माकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:30 IST

Open in App

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड केली आहे. विश्वचषक स्पर्धा जिंकणं कोणत्याही खेळाडू किंवा कर्णधाराचं लक्ष्य असतं, असं रोहित कर्णधारपद स्वीकारल्यानंतर म्हणाला. शतक झाल्यानंतर छान वाटतं. पण विश्वचषक जिंकल्यानंतर होणाऱ्या आनंदाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही, असं रोहितनं म्हटलं.

बुधवारी बीसीसीआयनं रोहित शर्माची एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली. टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१ नंतर विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर टी-२० संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली. आता टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाची जबाबदारीदेखील रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात बोलताना रोहितनं कर्णधार म्हणून त्याची भूमिका स्पष्ट केली. 

'जेव्हा तुम्ही एखादा खेळ खेळता, तेव्हा तुमचं लक्ष्य सर्वश्रेष्ठ होणं असतं. सर्वात मोठं जेतेपद जिंकणं तुमचं उद्दिष्ट असतं. तुम्ही कितीही शतकं केलीत तरीही तुम्हाला अजिंक्यपद पटकावयचं असतं, कारण ते सांघिक कामगिरीच्या जोरावरच जिंकता येतं. सगळ्यांच्या प्रयत्नांनीच जेतेपद मिळवता येतं. आम्ही सांघिक खेळ खेळतो. त्यामुळे संघ म्हणून आम्ही जे मिळवू शकू ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल', असं रोहित शर्मानं सांगितलं.

२०१३ मध्ये भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. मात्र त्यानंतर संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदाच्या वर्षीची टी-२० विश्वचषक स्पर्धा संघासाठी अतिशय वाईट ठरली. पाकिस्ताननं विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारताला मात दिली. त्यानंतर न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं. यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. भारताचं आव्हान सुपर १२ मध्येच संपुष्टात आलं.

टॅग्स :रोहित शर्मा
Open in App