कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाचे 30 लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा 2 लाख 11,609 इतका झाला आहे. आतापर्यंत 9 लाख 22, 581 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरस आटोक्यात आला तरी त्याचा परिणाम प्रदीर्घ काळ जाणवणार आहेत. त्यामुळे क्रिकेट स्पर्धा कधी चालू होतील, याची भविष्यवाणी करणे अवघडच आहे. त्यात भारतीयांना प्रतीक्षा लागली आहे ती इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तेराव्या मोसमाची... कोरोना व्हायरसमुळे आयपीएल दोन वेळा पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) घ्यावा लागला. आयपीएलसाठी बीसीसीआय विविध पर्यायांचा विचार करत आहे. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं यावर्षी आयपीएल होणार नाही, अशी भविष्यवाणी केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे टोक्यो ऑलिम्पिक, विम्बल्डन आदी ऐतिहासिक स्पर्धाही रद्द कराव्या लागल्या. त्यात अनेक क्रिकेट स्पर्धाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती सुधरेल आणि आयपीएल व ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे, पण, रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरचं मत वेगळच आहे. त्यानं आयपीएल आणि वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
तो म्हणाला,''18 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल. त्याशिवाय यंदा आयपीएल होणार नाही, असं मला वाटतं. पण, ही विश्रांती खेळाडूंना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायद्याची ठरेल.''
मोदी सरकारचं कौतुक...
यावेळी अख्तरनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तो म्हणाला,''कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मोदी सरकरानं घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय या योग्य होता. कोरोनाला रोखण्यासाठी हाच एक चांगला उपाय आहे.''