Join us  

टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत

MS DHONI : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमातील कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे पुनरागमन अवलंबून आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:11 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमातील कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे पुनरागमन अवलंबून आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगल्या आहेत, परंतु आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला कमबॅक करण्याची संधी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तसे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएलचा 13 वा मोसम गाजवण्यासाठी धोनी सज्ज झाला आहे. त्यासाठी तो मैदानावर कसून घामही गाळत आहे. 

बीसीसीआयनं नुकतीच निवड समितीच्या नव्या सदस्यांची घोषणा केली.  भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) ही घोषणा केली. त्याचबरोबर या पाच सदस्यीय समितीमध्ये माजी जलदगती गोलंदाज हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. निवड समितीमध्ये जतीन परांजपे (पश्चिम विभाग), शरणदीप सिंग (उत्तर), देवांग गांधी (पूर्व) हे सदस्य पुर्वीपासूनच आहेत.

या नव्या समितीनं टीम इंडियाच्या आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रविवारी संघ जाहीर केला. पण, या नव्या समितीची निवड करताना बीसीसीआयनं सर्व अर्जकर्त्यांना धोनीच्या भविष्याबाबतचा प्रश्न विचारला आणि त्यावरून सुनील जोशी यांची निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले. पण, नवी समिती असली तरी धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या अटी अन् शर्ती कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

सूत्रांनी सांगितले की,''दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत धोनीच्या नावाचा विचार केला गेला नाही. त्याच्या भविष्याबाबतही चर्चा झाली नाही. त्यानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तरत टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. हा नियम केवळ त्याच्यासाठी नाही, तर अन्य वरिष्ठ खेळाडू आणि युवा खेळाडूंनाही लागू आहे. जो चांगली कामगिरी करेल, त्याच्या नावाचा नक्की विचार केला जाईल. त्यामुळे भविष्यात आश्चर्याचे धक्के बसू शकतात.'' ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडण्यापूर्वी आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईनं लक्ष असेल.  

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दोनच भारतीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व!

 ...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2020बीसीसीआय