Join us

वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला अखेरच्या दोन वन डे सामन्यांत चमक दाखवण्याची संधी मिळाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 13:56 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियाकडून वन डे मालिकेत हार पत्करावी लागली. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला अखेरच्या दोन वन डे सामन्यांत चमक दाखवण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला फलंदाजीत आणि यष्टिमागेही अपयश आले. दोन सामन्यांत त्यानं 52 ( 36 व 16) धावा केल्या. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पंतऐवजी दिनेश कार्तिकचा राखीव यष्टिरक्षक म्हणून समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण, इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला पर्याय म्हणून पंतच योग्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे.आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि पाँटिंग या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतला संधीचं सोनं करता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याचे आव्हान मला पेलावं लागणार आहे. अपयश मागे टाकून नव्या उमेदीनं त्याला मैदानावर उतरण्यासाठी सज्ज करावे लागणार आहे. तो कमबॅक करेल. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ धोनीला राखीव खेळाडू म्हणून कोणाच्या शोधात असेत तर पंत हाच योग्य पर्याय आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर तो कमबॅक करेल. ''

पण, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं आयपीएलमधील कामगिरी ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघासाठी ग्राह्य धरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोहली म्हणाला,'' या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ निवडण्यात येईल. वर्ल्ड कप संघ निवडताना वेगळ्या गणितांचा विचार केला जातो आणि वर्ल्ड कपसाठी आम्हाला मजबूत संघ हवा आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आम्हाला वर्ल्ड कप संघ निश्चित करायचा आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीनंतर या संघात बदल होईल, असे मला वाटत नाही. एक-दोन खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून त्यांना संघातून वगळले जाईल असं नाही.'' 

टॅग्स :रिषभ पंतमहेंद्रसिंग धोनीदिल्ली कॅपिटल्सआयपीएल