आयपीएल २०२६ च्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील झालेला अनुभवी फलंदाज नितीश राणा याने एक खळबळजनक खुलासा केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांनंतर आता दिल्लीकडून खेळण्याचा निर्णय त्याने नेमका कोणाच्या सांगण्यावरून घेतला, याचे उत्तर आता समोर आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये नितीश राणाने या पडद्यामागच्या घडामोडींवर प्रकाश टाकला. राणा म्हणाला की, दिल्ली संघात सामील होण्यापूर्वी त्याच्या मनात साशंकता होती, आणि यावर सल्ला घेण्यासाठी त्याने फक्त ऋषभ पंत याला फोन केला. राणा म्हणाला की, "मी दिल्लीच्या संघात सामील व्हावे की नाही, यावर चर्चा करण्यासाठी ऋषभ हीच सर्वोत्तम व्यक्ती होती. त्याने या संघाचे नेतृत्व केले आहे आणि इथल्या वातावरणाची त्याला पूर्ण कल्पना आहे. जेव्हा मी त्याला विचारले, तेव्हा त्याने विचार करण्यासाठी एक मिनिटही घेतला नाही. अवघ्या ३ सेकंदात तो म्हणाला की,तुझ्यासाठी यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. कोणताही विचार न करता सरळ हो म्हणून टाक." यानंतर राणाने कोणत्याही पर्यायाचा विचार न दिल्ली कॅपिटल्सची जर्सी अंगावर चढवण्याचा निर्णय घेतला.
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली नवी इनिंग
नितीश राणा या हंगामात अक्षर पटेल याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. दिल्लीचा संघ आपला पहिला सामना १ एप्रिल रोजी लखनौविरुद्ध खेळणार असून, मधल्या फळीत राणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नितीश राणा हा आयपीएलमधील एक अनुभवी खेळाडू मानला जातो. २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या राणाने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने छाप पाडली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ११८ आयपीएल सामने खेळले असून त्याने २७.९७ च्या सरासरीने २ हजार ८५३ धावा केल्या आहेत, ज्यात २० अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या काही हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी मॅच-विनिंग खेळी केल्या होत्या.