Abu Dhabi T10 League : भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनाने ( Suresh Raina) परदेशी लीगमधून बुधवारी पदार्पण केले. पण, त्याला अबु धाबी टी १० लीगमध्ये पहिल्याच सामन्यात शून्यावर माघारी परतावे लागले. डेक्कन ग्लॅडिएटर संघाकडून सुरेश रैनाने नव्या इनिंग्जची सुरूवात केली. रैना फेल झाला असला तरी या लीगचा पहिला दिवस वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी गाजवला. मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या किरॉन पोलार्डने वादळी खेळी केली, त्यातन ३-४ दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद सोडणाऱ्या निकोलस पूरन याची बॅट चांगलीच तळवली.
डेक्कन ग्लेडिएटर विरुद्ध टीम अबु धाबी यांच्यातल्या सामन्यात सर्वांचे लक्ष सुरेश रैनावरच होते. बिल स्मीद ( ०) व टॉम कोहलेर-कॅडमोर ( १३) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर रैना फलंदाजीला आला. पण, दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजाच्या हाती झेल देऊन तो शून्यावर माघारी परतला. पण, कर्णधार निकोलस पूरनने ३३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकार खेचून नाबाद ७७ धावांची खेळी करताना संघाला १० षटकांत ६ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. ओडीन स्मिथनेही १२ चेंडूंत २३ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम अबु धाबीला ६ बाद ९९ धावाच करता आल्या. जेम्स व्हिसी ( ३७) व फॅबियन अॅलेन ( २६*) यांनी टक्कर दिली.
दुसऱ्या सामन्यात बांगला टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना एव्हिन लुईसच्या ५८ धावांच्या ( २२ चेंडू, २ चौकार व ७ षटकार) जोरावर ५ बाद १३१ धावा केल्या. कॉलिन मुन्रोने ३० धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यू यॉर्क स्ट्रायकर्सकडून आजम खान व कर्णधार
किरॉन पोलार्ड यांनी दमदार खेळी केली. खानने १३ चेंडूंत ३४ धावा कुटल्या, तर पोलार्डने १९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी अपयशाचा पाढा गिरवल्याने स्ट्रायकर्सचा पराभव झाला. टायगर्सने १९ धावांनी सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"