Join us
Daily Top 2Weekly Top 5

NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्ले ऑफच्या तीन जागेवरील दावेदार निश्चित झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:20 IST

Open in App

जयपूर, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्ले ऑफच्या तीन जागेवरील दावेदार निश्चित झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानने लीगमध्ये कमबॅक केले. त्यामुळे त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जीवंत राहिल्या आहेत. पण, त्यासाठीच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व भारतीय खेळाडूच्या खांद्यावर असणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानला पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत ऑस्ट्रेलियाच्या स्मिथकडे सोपवण्यात आले. स्मिथने संघाला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आणले, परंतु आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य असलेल्या स्मिथला मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ पुन्हा अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

राजस्थानचा संघ 13 सामन्यांत 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मागील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बंगळुरूच्या आशा संपुष्टात आल्या, तर राजस्थानला अजूनही संधी आहे. स्मिथने 12 सामन्यांत 39.87च्या सरासरीनं 319 धावा केल्या आहेत. पण, आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्याला मायदेशी परतावे लागले आहे. रहाणेने 13 सामन्यांत 35.54च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचा समावेश आहे. राजस्थानला अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे.  

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्सअजिंक्य रहाणेस्टीव्हन स्मिथदिल्ली कॅपिटल्स