दुबई : तब्बल ४९ वर्षांचा विजयाचा दुष्काळ आज न्यूझीलंडने संपवला. गेल्या ४९ वर्षांमध्ये न्यूझीलंडला आपल्या देशाबाहेर पाकिस्तानला एकदाही मालिका जिंकता आली नव्हती. आज आबुधाबीमध्ये न्यूझीलंडने हा पराक्रम करताना पाकिस्तानवर १२३ धावांनी मात केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी खिशात टाकली आहे.
न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी २८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव १५६ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून बाबर आझमने ५१ धावांची खेळी साकारत न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण बाबरला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊथी, एजाझ पटेल आणि विल्यम सोमरविल यांनी प्रत्येकी तीन बळी पटकावले.