Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! न्यूझीलंडकडून खूप काही शिकण्यासारखं; भारताविरुद्धचा विजय ते चॅम्पियन

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला.

By ओमकार संकपाळ | Updated: October 21, 2024 15:38 IST

Open in App

'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती', हा डायलॉग न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाला तंतोतंत लागू होतो. ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर किवी संघाने असामान्य कामगिरी करुन दाखवली. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या भारतीय संघाला नमवून न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. विशेष बाब म्हणजे किवी संघाचा इतिहास पाहता हा विजय खूपच महत्त्वाचा ठरला. कारण मागील दहा सामने गमावणाऱ्या किवी संघाने बलाढ्य भारताला पराभवाची धूळ चारली आणि ट्रॉफीपर्यंत प्रवास केला. २००० मध्ये वन डे विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी तब्बल २४ वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. या विजयासह जगाला एक नवा चॅम्पियन मिळाला.

२०१६ च्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करुन न्यूझीलंडने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. सर्वाधिक पाचवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने किवी संघाचा मार्ग थोडा सोपा झाला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली. आफ्रिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन संघ खूप तगडा आहे... त्यामुळे कांगारुंना उपांत्य फेरीपर्यंतच रोखल्याने आफ्रिकेने न्यूझीलंडला मदतच केली. कारण ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत असती तर न्यूझीलंडला विश्वचषक जिंकण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागला असता. विशेष बाब म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाशिवाय विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. 

चार ऑक्टोबर रोजी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला. कागदावर तगडा असलेल्या भारताला सलामीच्या सामन्यातच दारुण पराभव पत्करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने आपल्या पराभवाची मालिका संपवली. इथून त्यांनी आपला विजयरथ कायम ठेवताना पुढे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन किताब उंचावला. न्यूझीलंडने केलेली सांघिक कामगिरी इतर संघांसाठी एक संदेश आहे. भारतासारख्या अतिआत्मविश्वास बाळगणाऱ्या संघांनी त्यांच्याकडून शिकायला हवे अशी चाहत्यांची भावना आहे. विश्वचषकाला सुरुवात होण्याआधी भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होते. मात्र, अखेरीस न्यूझीलंड एक नवा चॅम्पियन म्हणून जगासमोर आला. 

भारतासारख्या सर्वात ग्लॅमरस संघाला २०१६ नंतर प्रथमच साधी उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारताला स्पर्धेबाहेर फेकले. केर अमेलिया यांसारख्या युवा खेळाडूंची फौज असलेल्या किवी संघाने बलाढ्य संघांना धूळ चारण्यात यश मिळवले. रविवारचा दिवस न्यूझीलंडसाठी खूपच खास ठरला... त्यांच्या पुरुष संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला, तर महिला संघाने इतिहासात प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी दहा पराभवांचे ओझे डोक्यावर घेऊन आलेल्या किवी संघांने ऐतिहासिक कामगिरी करुन नवा आदर्श ठेवलाय. क्रिकेट हा कसा सांघिक खेळ आहे याचा प्रत्यय देणाऱ्या न्यूझीलंडने अपराजित राहून ट्रॉफी आपल्या घरी नेली. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंडआयसीसी