न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा ‘सफाया’

जेमिसन भेदक  : २-० ने जिंकली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 04:57 IST2021-01-07T04:56:22+5:302021-01-07T04:57:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
New Zealand wipes out Pakistan in test series by 2-0 | न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा ‘सफाया’

न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा ‘सफाया’

ख्राईस्टचर्च : वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याच्या भेदक माऱ्याच्या (४८ धावात ६ बळी) जोरावर न्यूझीलंडने बुधवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा एक डाव १७६ धावांनी पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ केले. कर्णधार केन विल्यमसनने द्विशतकी खेळीसह १२९.३ च्या सरासरीने ३८८ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.


पाक संघ पहिल्या डावात ३६२ धावांनी माघारला होता. चौथ्या दिवशी त्यांचा दुसरा डाव १८६ धावात आटोपला. न्यूझीलंडने पाकच्या पहिल्या डावातील २९७ धावांच्या उत्तरात ६ बाद ६५९ धावा उभारून डाव घोषित केला होता. केन विलियम्सनने २३८, हेन्री निकोल्स १५७ आणि डेरेन मिचेलने नाबाद १०२ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात ६९ धावात पाच गडी बाद केल्यानंतर जेमिसनने दुसऱ्या डावातही सहा गडी बाद केले. त्याने ११७ धावात एकूण ११ बळी घेतले. सहा सामन्यात चौथ्यांदा त्याने दहा किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची किमया साधली आहे.


न्यूझीलंडने या सत्रात चारही सामने जिंकले. त्याचे बरेचसे श्रेय जेमिसनला जाते. त्याला आधी फलंदाज संबोधले जायचे मात्र त्याने उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर शानदार मारा करीत गोलंदाजीतही चुणूक दाखवली.


   पाकने चौथ्या दिवशी १ बाद ८ धावांवरून पुढे खेळ सुरू केला. ट्रेंट बोल्टने नाईट वॉचमन मोहम्मद अब्बासला बाद केले. त्यानंतर जेमिसनने उपाहार आणि चहापानाच्या वेळेपर्यंत पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणले. विलियम्सन यानेही शाहीन आफ्रिदीला बाद करीत कर्णधार या नात्याने पहिला गडी बाद केला.  बोल्टने जफर गोहारचा बळी घेत सामना संपविला.

कसोटीत पहिल्यांदाच अव्वलस्थानी
n पाकिस्तान संघाला क्लीन स्विप देत न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. मागच्या दहा वर्षात नंबर वन बनलेला न्यूझीलंड सहावा संघ ठरला.  ११८ गुणांसह न्यूझीलंड आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. 
n दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाचे ११४ गुण आहेत. १०६ गुणांसह इंग्लंड चौथ्या तर ९६ गुणांसह दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.  
n कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ (७० गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया (७६.७) अव्वल स्थानावर आहे तर भारतीय संघ (७२.२) दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. 
 

Web Title: New Zealand wipes out Pakistan in test series by 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.