Join us

पाकिस्तानची हाराकिरी सुरूच, ओढवली 'व्हाईटवॉश'ची नामुष्की! न्यूझीलंडने दिला मोठा दणका

न्यूझीलंडच्या बेन सियर्सने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:45 IST

Open in App

Pakistan lost to New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने अतिशय सुमार कामगिरी केली. परिणामी त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांची खराब कामगिरी अजूनही सुरुच आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानवर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. पहिले दोन गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेट संघाचा पराभव केला. बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात किवी संघाने ४३ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-० ने जिंकली. पावसामुळे हा सामना ४२ षटकांचा करण्यात आला होता. हवामान लक्षात घेऊन पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ केवळ ४० षटकांत २२० धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने शानदार गोलंदाजी केली आणि ५ विकेट्स घेतल्या.

सीयर्स, ब्रेसवेल चमकले...

पावसामुळे कमी करण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १६४ धावात ४ बळी गमावले होते. त्यामुळे मोठी धावसंख्या गाठणे कठीण वाटत होते. पण कर्णधार मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५९ धावा केल्या. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे किवी संघाने ४२ षटकांत २६४ धावा केल्या. या आव्हानाचा बचाव करताना, बेन सीयर्सने पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ९ षटकांत फक्त ३४ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. संपूर्ण मालिकेत सियर्सने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याने त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

चांगल्या सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव गडगडला...

२६५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला तिसऱ्या षटकात मोठा धक्का बसला. पाकिस्तानी संघाने विकेट गमावली नाही, पण दुखापतीमुळे सलामीवीर इमाम उल हक दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी उस्मान खानला 'कन्कशन सब' म्हणून खेळवण्यात आले. यानंतर बाबर आझम-अब्दुल्ला शफीक यांनी डाव सावरवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला पहिला धक्का १७ व्या षटकात ७३ धावांवर बसला आणि त्यानंतर संपूर्ण डाव गडगडला. पाकिस्तान संघाला कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. शफीक बाद झाल्यानंतर पाच षटकांनंतर उस्मान खानही बाद झाला. पाठोपाठ बाबरदेखील माघारी परतला. पाकिस्तानचा निम्मा संघ १६९ धावांवरच बाद झाला होता. यानंतर, उर्वरित फलंदाजांनी एकूण ५२ धावा केल्या. त्यामुळे चांगली सुरुवात करुनही पाकिस्तानची फलंदाजी २२१ धावांवर संपुष्टात आली.

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड