Join us  

NZ vs IND : न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात सर्वात उंच खेळाडूला संधी देणार, Team Indiaची चिंता वाढणार!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमानांनी विजयी सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 1:20 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमानांनी विजयी सलामी दिली. ट्वेंट-20 मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर वन डे मालिकेतील हा विजय न्यूझीलंड संघाचे मनोबल उंचावणारा ठरला आहे. पण, दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा गोलंदाज स्कॉट कुग्गेलेइजन आजारी पडला आहे आणि त्यानं या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंड संघानं त्यांच्या सर्वात उंच गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 6.8 फुटाचा हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात उद्या पदार्पण करणार आहे आणि त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान 4 विकेट्स राखून परतवले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना 48.1 षटकांतच 6 बाद 348 धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद 109 धावा करुन सामनावीर ठरला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर ( 103),  लोकेश राहुल ( नाबाद 88) आणि विराट कोहली ( 51) यांनी दमदार खेळी केली होती. त्याला न्यूझीलंडच्या रॉस टेलर ( नाबाद 109), हेन्री निकोल्स ( 78) आणि टॉम लॅथम ( 69) यांनी तोडीत तोड उत्तर दिले. 

त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा किवींचा निर्धार आहे. पण, त्यांचा गोलंदाज स्कॉटनं माघार घेतली आहे. दुखापतीमुळे किवींचा कर्णधार केन विलियम्सन आणि ल्युकी फर्गुसन यांनी आधीच माघार घेतली होती. त्यात स्कॉटचे आजारपण किवींची डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहे. पण, त्याच्या जागी संघात उद्याच्या सामन्यात 6.8 फुटाचा गोलंदाज कायले जॅमिसन याला संधी मिळणार आहे. न्यूझीलंडमधील सर्वात उंच क्रिकेटपटू म्हणून कायलेची ओळख आहे. तो उद्याच्या सामन्यातून वन डे संघात पदार्पण करणार आहे. 

हा 'जाइंट' किलर जेमिसन नेमका आहे तरी कोण...जेमिसनचा जन्म ऑकलंडमध्ये झालेला आहे. स्थानिक सामन्यांमध्ये जेमिसनने दमदार कामगिरी केली आहे. जेमिसनने आतापर्यंत २५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, या २५ सामन्यांमध्ये जेमिसनने ७२ बळी मिळवले आहेत. आतापर्यंत एका डावात आठ विकेट्स घेण्याचा पराक्रमही जेमिसनने केलेला आहे. त्यामुळे भारताला धक्का देण्यासाठी आता न्यूझीलंडने जेमिसनला पाचारण केले आहे.

दोन्ही संघन्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हॅमिश बेन्नेट, टॉम ब्लंडल, कॉलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्तील, कायले जेमिसन, स्कॉट कुग्गेलेइजन, टॉम लॅथम, जिमी निशॅम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, टीम साऊदी, रॉस टेलर. 

भारताचा वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव.

Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...

IPL 2020 : राजस्थान रॉयल्स संघातील Jofra Archerची रिक्त जागा भरण्यासाठी तिघं शर्यतीत

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंड