RCB New Player IPL 2025 Playoffs: स्पर्धेच्या प्लेऑफ्समध्ये पोहोचताच बंगळुरू संघात एका नवीन खेळाडूची एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू खूपच खास आहे, कारण त्याने चक्क पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना काही महिन्यांपूर्वीच सळो की पळो करून सोडले होते. आता RCBचा संघ प्लेऑफ मध्ये पोहोचला असताना हा खेळाडू संघात बदली खेळाडू म्हणून दाखल झाला आहे. हा खेळाडू म्हणजे टिम सेफर्ट ( Tim Seifert). न्यूझीलंडचा हा यष्टीरक्षक फलंदाज जेकब बेथेल याच्या जागी संघात येणार आहे. बेथेलला विंडिज विरूद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडला परतावे लागले. त्याच्याजागी सेफर्टला संधी देण्यात आली आहे.
RCB ने टिम सेफर्टला किती पैसे दिले?
प्लेऑफपूर्वी आरसीबीमध्ये सामील होणारा टिम सेफर्ट हा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीही संघात सामील झाला आहे. आरसीबीने टिम सेफर्टच्या सामील होण्याबाबत एक प्रेस रिलीज जारी केले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, RCB ने टिम सेफर्टला २ कोटींच्या मानधनासह संघात सामील करून घेतले आहे.
पाकिस्तान विरूद्ध सेफर्टचा धमाका
टिम सेफर्ट हा पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला होता. पाकिस्तानचा संघ या वर्षी मार्चमध्ये ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर होता. न्यूझीलंडने ती मालिका जिंकली होती, ज्यामध्ये टिम सेफर्ट विजयाचा नायक ठरला होता. टिम सेफर्टने पाकिस्तानविरुद्धच्या त्या मालिकेत सर्वाधिक २४९ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ६२ पेक्षा जास्त होती आणि स्ट्राईक रेटही २००च्या वर होता. सेफर्टने २२ षटकार आणि २० चौकार मारले होते.
सर्व टी२० लीगचा अनुभव
टिम सेफर्टच्या एकूण टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त त्याला PSL, ILT20, BBL, CPL, LPL आणि T20 ब्लास्ट तसेच IPL मध्ये अशा सर्वच स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून IPL सामने खेळले आहेत. यावेळी तो आरसीबीच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे. तो २४ मे पर्यंत संघात सामील होईल.