Join us

Tim Southee Farewell Test : पाहुण्यांसमोर न्यूझीलंडचा संघ ठरला बेस्ट!

इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २-० अशी आपल्या नावे केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:23 IST

Open in App

New Zealand Beat England In Tim Southee Farewell Test Match : न्यूझीलंडच्या संघानं हॅमिल्टनच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठा विजय नोंदवला आहे. कीवी संघानं पाहुण्यांना ४२३ धावांनी शह देत टिम साउदीचा अखेरचा कसोटी सामना अविस्मरणीय केला. न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ६५८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला.

मालिका गमावली, पण साउदीचा निरोपाचा सामना ठरला खास  

न्यूझीलंडचा स्टार जलदगती गोलंदाज टिम साउदी या सामन्यात शेवटचा आंतरारष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. किवी संघानं मालिका आधीच गमावली होती. पण या विजयासह त्यांनी साउदीच्या निरोपाचा सामना अविस्मरणीय केला. इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २-० अशी आपल्या नावे केली. 

पहिल्या डावात न्यूझीलंड ३०० पार; इंग्लंडचा डाव २०० धावांच्या आतच आटोपला

न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावात ३४७ धावा केल्या होत्या. या डावात तळाच्या फलंदाजीत मिचेल सँटनरनं ७६ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय टॉम लॅथमनं ६३ धावा केल्या. अखेरच्या सामन्यात टिम साउदीनं १० चेंडूत १ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २३ धावांची खेळी केली होती.  इंग्लंड कडून मॅथ्यू पॉट्सनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १४३ धावांत आटोपला होता. संघाकडून जो रूटनं सर्वाधिक ३२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्रीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. 

दुसऱ्या डावात केन विलियम्सन चमकला

दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून केन विलियम्सन याने  २०४ चेंडूत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५६ धावांची खेळी केली त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं दुसऱ्या डावात ४५३ धावा करत इंग्लंडसमोर ६५८ धावांचे टार्गेट  सेट केले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जॅकब बेथेल याने सर्वाधिक ७६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. टिम साउदीला अखेरच्या सामन्यात २ विकेट्स मिळाल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ सामन्यात ३९१ विकेट्स घेतल्या आहेत.

 

टॅग्स :न्यूझीलंडइंग्लंडकेन विलियम्सन