Join us

काजव्यांनी पुन्हा फडकवली तिमिरात विजयी पताका

मंगळवारी न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी सामना रोमांचक अवस्थेत संपला. मला वाटतं की, क्रिकेटमधल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:47 IST

Open in App

मतीन खानस्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

२८ फेब्रुवारीचा दिवस हा क्रिकेटच्या इतिहासात त्या काजव्यांसाठी लक्षात ठेवला जाईल, ज्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमुळे कसोटी विश्वावर पसरत चाललेला अंधकार दूर केला. न्यूझीलंड-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीचा खेळ संपला, तेव्हा अनेकांच्या मनात एकच विचार सुरू होता की, अखेरच्या दिवशी इंग्लिश संघ पुन्हा ‘बेझबॉल क्रिकेट’ पद्धतीने विजय मिळवणार का, की किवींचा संघ त्यांचा विजयरथ रोखणार ? पण जे घडले ते क्रिकेटच्या अक्षरात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.

मंगळवारी न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी सामना रोमांचक अवस्थेत संपला. मला वाटतं की, क्रिकेटमधल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता. अवघ्या एका धावेने सामना जिंकण्याची कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या आणि २,४९४ सामन्यांच्या प्रदीर्घ इतिहासातली ही केवळ दुसरी वेळ होती. न्यूझीलंडच्या या झुंजार विजयाने एक गोष्ट स्पष्ट केली की, संघातील प्रत्येकच खेळाडूने जबरदस्त योगदान दिले. मग तो विल्यम्सन असो, साउदी असो की शेवटचा बळी घेणारा नील वॅगनर. न्यूझीलंडसाठी सर्वार्थाने हा विजय खूप मोठा आहे. कारण संपूर्ण सामन्यात त्यांच्या विजयाची शक्यता जवळपास शून्य होती. 

मला तर वाटते की, हा सामना कोणीच हरले नाही. कारण मनाला रुखरुख लावून गेलेला पराभव स्वीकारल्यानंतरही बेन स्टोक्स जेव्हा पॅव्हेलियनमधून बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पराभूत मानसिकतेचे कुठलेच भाव नव्हते. तर तो स्मित हास्य करत होता. त्याचे हे सर्वांगसुंदर हसणे सांगत होते की, हा सामना आपण हरलेलो नाही. तर एका सर्वस्व पणाला लावलेल्या सामन्याचे आपण साक्षीदार झालेलो आहोत. 

शेवटी अशा सामन्यांमध्ये जय-पराजय हा एका क्षणाचा मामला असतो. कसोटी क्रिकेटला पुन्हा सुगीचे दिवस आणण्यामागे हा सामना मैलाचा दगड ठरल्यास नवल वाटणार नाही. याप्रसंगी मला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातल्या फ्रँक वॉरेल ट्रॉफीमधला जवळपास ३० वर्षांपूर्वीचा जानेवारी १९९३ रोजी ॲडिलेडला खेळविला गेलेला  कसोटी सामना आठवतो आहे. ज्यामध्ये रिची रिचर्डसनच्या कर्णधारपदाखाली वेस्ट इंडीजने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा एका धावेने पराभव केला होता. मार्क टेलर, डेविड बून, जस्टिन लँगर, स्टीव्ह वॉ, ॲलन बोर्डर, शेन वॉर्न आणि ग्रॅम मॅक्डरमॉट यांसारख्या मातब्बर खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या संघात भरणा होता. 

ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज कसोटी (२३ ते २७ जानेवारी १९९३, फ्रँक वॉरेल ट्रॉफी) 

संक्षिप्त धावफलकवेस्ट इंडीज पहिला डाव : २५२ (लारा ५२, ज्युनियर मरे नाबाद ४९, सिमन्स ४६, हेन्स ४५. मर्व्ह ह्यूजेस ५/६४) ऑस्ट्रेलिया पहिला डाव : २१३ (मर्व्ह ह्यूजेस ४३, स्टीव्ह वॉ ४२, कर्टली ॲम्ब्रोज ६/७४) वेस्ट इंडीज दुसरा डाव : १४६ (रिची रिचर्डसन ७२, कार्ल हूपर २५. टिम मे ५/९, मॅकडरमॉट ३/६६) ऑस्ट्रेलिया दुसरा डाव: १८४ (लॅंगर ५४, मे नाबाद ४२. ॲम्ब्रोज ४/४६, वॉल्श ३/४३). 

    सध्या टी-२० लीग आणि वनडे या लखलखाटी क्रिकेटच्या प्राबल्यात आज लुकलुकणाऱ्या कसोटीरूपी काजव्यांनी पुन्हा तिमिरात विजयी पताका फडकवली आहे. अशा क्षणांसाठी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचा एक शेर लागू पडतो.

जुगनुओं ने फिर अंधेरे से लड़ाई जीत ली चांद-सूरज घर के रोशनदान में रखे रह गए

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंड
Open in App