- अयाझ मेमन
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या यशानंतर आता पुन्हा एकदा भारतीय संघ खडतर दौ-यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच भूमीमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बाजी मारण्याच्या निर्धाराने खेळेल. आॅस्टेÑलियाच्या तुलनेत न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या खूप वेगळ्या आहेत. येथे वेगवान गोलंदाजांना चांगल्या प्रकारे मदत मिळते, शिवाय न्यूझीलंड संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचप्रमाणे, गेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ उपविजेता ठरला होता, हे विसरता कामा नये. त्यामुळेच कोहलीच्या संघापुढे पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे आहे. त्याच वेळी कोहली संघात कसे प्रयोग करतो, संघ संतुलन कसे होणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
त्याचबरोबर, न्यूझीलंडमधील परिस्थिती काही प्रमाणात इंग्लंडप्रमाणे असल्याने, भारतीय संघाकडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी चांगली संधी आहे. आता विश्वचषक स्पर्धेपूर्वी भरतीय संघ मर्यादित षटकांचे १० सामने खेळेल. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरेल. याच सामन्यांतून भारतीय संघाला आपल्या राखीव खेळाडूंनाही पारखण्याची संधी मिळेल. खेळाडूंच्या दृष्टिकोनातून सांगायचे म्हणजे खरी परीक्षा त्यांचीच असेल. कारण संघात स्थान मिळविण्यासाठी सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू आहे.
न्यूझीलंड दौºयात भारताला जसप्रीत बुमराहची कमी नक्कीच जाणवेल. अनेकांच्या मते, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बुमराह सर्वोत्तम गोलंदाज आहे, शिवाय कसोटी क्रिकेटमध्येही त्याने छाप पाडली. त्यामुळे त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल, पण त्याच वेळी इतर गोलंदाजांकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधीही असेल. बुमराहला विश्रांती देण्यावरून थोडा वादही झाला, पण तो संपूर्ण वर्षभर खेळत आलेला असल्याने त्याला विश्रांती मिळणे खूप गरजेचे होते. त्यामुळेच मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांसारख्या वेगवान गोलंदाजांवर आता जबाबदारी वाढली आहे.
पाच एकदिवसीय सामन्यांचा न्यूझीलंड दौरा भारताचा अखेरचा विदेशी दौरा असेल. यानंतर, काही संघ भारतात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास येतील. भारतातील परिस्थिती इंग्लंडच्या तुलनेत पूर्ण वेगळी आहे. त्यामुळेच विदेशातील खेळाडूंची कामगिरी भारतीय संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या जोरावरच भारताचा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात येईल, पण प्रमुख खेळाडूंचा अपवाद वगळला, तर अजूनपर्यंत संघात पक्के स्थान मिळविणारे खेळाडू भरतीय संघ व्यवस्थापनाला मिळालेले नाहीत. त्यामुळेच खेळाडूंकडे मोठी संधी असेल. दबावाचे म्हणाल, तर प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात दडपण असतेच.
(संपादकीय सल्लागार)