Join us  

पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलोच नव्हतो, राहुल द्रविडने केलं स्पष्ट

'मी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलो नव्हतो. मी फक्त पाकिस्तानच्या उजव्या हाताच्या गोलंदाजाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 1:39 PM

Open in App

मुंबई - न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विश्वचषक जिंकला. सोमवारी विजयी भारतीय संघ मायदेशी परतला. न्यूझीलंडहून मुंबईला पोहोचल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार पृथ्वी शॉने प्रसारमाध्यमांशी बातचीत करत आपले अनुभव मांडले. यावेळी बोलताना राहुल द्रविडने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. पाकिस्तान अंडर-19 क्रिकेट संघाचे टीम मॅनेजर नदीम खान यांनी रविवारी कराचीत बोलताना राहुल द्रविडने त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये येऊन खेळाडूंचं मनोधौर्य वाढवल्याचं सांगितलं होतं. मात्र राहुल द्रविडने स्पष्ट करत आपण त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलोच नव्हतो असं सांगितलं आहे. 

'मी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलो नव्हतो. मी फक्त पाकिस्तानच्या उजव्या हाताच्या गोलंदाजाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. टुर्नामेंटमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती. मी ड्रेसिंग रुमच्या बाहेरच त्याला भेटलो आणि तू चांगली गोलंदाजी करत असल्याचं सांगितलं. मी आतमध्ये गेलो नव्हतो', असं राहुल द्रविडने सांगितलं आहे. 

अंडर-19  वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा 203 धावनांनी दारूण पराभव केला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नदीम खान यांनी ज्या पद्धतीने आमच्या संघाचा पराभव झाला ते पाहता आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता असं वाटतं असं विचित्र विधान केलं. 

उपांत्य फेरीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना होईल असा आम्हाला विश्वास होता. पण अवघ्या 69 धावांमध्येच आमचा संघ गारद झाला. टीमची ही स्थिती पाहून असं वाटतं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणा केला आहे. दबावात कसा खेळ करावा आणि मैदानात काय होतंय याबाबत आमच्या फलंदाजांना काही कल्पनाच नव्हती असं वाटतं असंही ते पुढे म्हणाले. 

यावेळी बोलताना त्यांनी राहुल द्रविडने पाकिस्तानी खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली असं सांगितलं होतं.  द्रविडच्या या कृतीमुळे त्याच्याबाबतचा आमच्या मनातील सन्मान आणखी वाढला आहे, असंही ते पुढे बोलले होते. पण राहुल द्रविडने त्यांनी दिलेली माहिती चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. 

अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं  तब्बल 203 धावांनी धुव्वा उडवला.  शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद शतक (102)आणि कर्णधार पृथ्वी शॉ (42) व मनज्योत कालरा (47) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र अवघ्या 69 धावांतच गारद झाला. त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही भारतीय संघाने सहज पराभव केला आणि विश्वविजेतेपद पटकावलं.   

टॅग्स :राहूल द्रविड