मुंबई : दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत कधीही ‘शॉर्टकट’चा अवलंब केला नाही. ‘माझ्या वडिलांनी दिलेल्या या सल्ल्याचे मी नेहमीच पालन केले आणि आज एक वडील या नात्याने अर्जुनलाही हीच शिकवण देतोय,’ असे सचिनने म्हटले.
सचिनचा मुलगा अर्जुनने नुकत्याच टी२० मुंबई लीगमध्ये अष्टपैलू कामगिरी करीत आपला ठसा उमटवला. त्याला आकाश टायगर्स मुंबई पश्चिम उपनगर संघाने ५ लाख रुपयांत खरेदी केले होते. त्याने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामनाही खेळला.
अर्जुनला दबावाचा सामना करण्याविषयी कसे मार्गदर्शन केले, असे विचारले असता सचिन म्हणाला, ‘मी कधीही त्याच्यावर दबाव टाकला नाही. मी त्याच्यावर क्रिकेट खेळण्याचाही दबाव टाकला नाही. तो सुरुवातीला फुटबॉल खेळत होता, नंतर बुद्धिबळ आणि आता क्रिकेट खेळू लागला. मी त्याला जीवनात काहीही कर; परंतु ‘शॉर्टकट’चा अवलंब करू नको. माझे वडील (रमेश तेंडुलकर) यांनीदेखील मला हेच सांगितले होते आणि मीदेखील अर्जुनला हेच सांगितले. तुला कठोर मेहनत घ्यावी लागेल.’