Join us  

नेपाळनं वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला; अमेरिकेच्या फलंदाजांची शरणागती 

आयसीसीच्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू मध्ये बुधवारी नेपाळ संघानं ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:34 AM

Open in App

आयसीसीच्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू मध्ये बुधवारी नेपाळ संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. नेपाळ विरुद्ध अमेरिका या वन डे सामन्यात सर्वात निचांक खेळीची नोंद झाली. नेपाळनं अवघ्या 35 धावांत अमेरिकेचा डाव गुंडाळून वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला. संदीप लॅमिछानेनं सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. अमेरिकेचा सलामीवीर झेव्हीयर मार्शल ( 16) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. 2004मध्ये श्रीलंकेनं झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 35 धावांत माघारी पाठवला होता. त्यांनी 2003साली स्वतःच्याच नावावर ( 36 वि. कॅनडा) असलेला विक्रम मोडला. 

वन डे क्रिकेटमध्ये 12 षटकांत संपूर्ण संघ माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2017मध्ये झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ अफगाणिस्ताननं 13.5 षटकांत माघारी पाठवला होता. तत्पूर्वी 2003मध्ये ऑस्ट्रेलियानं 14 षटकांत नामिबियाचा डाव गुंडाळला होता. आजच्या सामन्यात नेपाळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात संदीपनं अमेरिकेला पहिला धक्का दिला. त्यानं सलामीवीर इयान हॉलंडला ( 0) माघारी पाठवले. मार्शल सातव्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर अमेरिकेच्या डावाची पडझड सुरूच झाली. 2 बाद 23 वरून अमेरिकेचा संपूर्ण संघ 35 धावांत तंबूत परतला. अमेरिकेचे 8 फलंदाज 12 धावांत माघारी परतले. संदीपनं 6 षटकांत एक निर्धाव आणि 16 धावांत 6 विकेट्स घेतल्या. त्याला सुशान भारीनं 4 विकेट्स घेत चांगली साथ दिली. 

या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवातही खराब झाली. कर्णधार ग्यानेंद्र मल्ला आणि सुबाश खाकुरेल हे दुसऱ्याच षटकात माघारी परतले. नोश्तूष केंजीगनं त्यांना बाद केले. पण पासर खडका ( 20*) आणि दिपेंद्र एईरी ( 15*) यांनी नेपाळला 5.2 षटकांत विजय मिळवून दिला. नेपाळनं 8 विकेट्स आणि 268 चेंडू राखून सामना जिंकला. 

टॅग्स :नेपाळआयसीसीअमेरिका