England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. फिल सॉल्ट व डेवीड मलान यांनी २२२ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला. त्यानंतर जोस बटलरचे वादळ घोंगावले. त्याला लिएम लिव्हिंगस्टोनची ( Liam Livingstone) साथ मिळाली आणि या दोघांनी १२ षटकांत १९८ धावांची खेळी केली. इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा नावावर करताना ४ बाद ४९८ धावा केल्या.   
सॉल्ट ९३ चेंडूंत १४ चौकार ३ षटकार खेचून १२२ धावांवर माघारी परतला. मलान १०९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२५ धावांवर बाद झाला. त्याने बटलरसह तिसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूंत १८४ धावांची भागीदारी केली. बटलरने ६५ चेंडूंत १५० धावा करताना वन डेतील दुसरे जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडने ४ बाद ४९८ धावा करताना वन डे क्रिकेटमध्ये नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. त्यांनी स्वतःचाच ६ बाद ४८१ ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१८) धावांचा विक्रम मोडला. बटलर ७० चेंडूंत ७ चौकार व १४ षटकारांसह १६२ धावांवर, तर लिव्हिंगस्टोन २२ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.  
 प्रत्युत्तरात नेदरलँड्सकडूनही तुलनेने चांगला खेळ झाला. त्यांनी ४९.४ षटकांत २६६ धावा केल्या. मॅक्स ओ'डोड ( ५५) व स्कॉट एडवर्ड ( ७२*) यांनी अर्धशतक झळकावले. मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर डेव्हिड विली, रिसे टॉपली व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. इंग्लंडचा हा वन डे क्रिकेटमधील दुसरा ( धावांच्या फरकाने) मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४२ धावांनी विजय मिळवला होता.