Join us  

"हार्दिक कर्णधार बनला हा रोहितचा अनादर नसून...", नवज्योतसिंग सिद्धूंचे रोखठोक मत

दिग्गज समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 6:47 PM

Open in App

आयपीएल २०२४ च्या माध्यमातून दिग्गज समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सिद्धू यांनी अप्रतिम समालोचनाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहत्यांना सामन्यात जिवंत ठेवण्यात ते माहिर आहेत. एका दशकानंतर त्यांची समालोचनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा एन्ट्री होत आहे. ते आयपीएलमध्ये समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. 

आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. दरम्यान, IPL ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियाद्वारे नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील केल्याची माहिती दिली. स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केली की, अत्यंत हुशार, महान नवज्योतसिंग सिद्धू आमच्या पॅनलमध्ये सामील झाले आहेत. त्यांची अप्रतिम कॉमेंट्री आणि शानदार वन लाइनर्स चुकवू नका. सिद्धू यांच्या आगळ्या-वेगळ्या कॉमेंट्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असेल.

सिद्धूंचे रोखठोक मत सिद्धू यांनी क्रिकेट जगतातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आयपीएल विश्वचषकासाठी वातावरणनिर्मिती करेल. यादरम्यान इतर कोणतीही स्पर्धा होणार नाही. कारण अवघ्या जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले असेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू प्रयत्नशील असतील यात शंका नाही. 

तसेच विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याचा फिटनेस. वय वाढत चालले असले तरी त्यांचा फिटनेस अधिकच चांगला होत चालला आहे. रोहित आणि विराट दोघेही आगामी विश्वचषकात महत्त्वाची भूमिका पार पाडतील, अशा शब्दांत त्यांनी किंग कोहलीच्या फिटनेसला दाद दिली.

मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर सिद्धू म्हणाले की, आमच्या वेळी खराब फॉर्म असताना देखील खेळाडूंना संघात स्थान मिळत होते. त्यावेळी खेळाडूंचीच कमतरता असायची. आता हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी भारतीय कर्णधाराची (रोहित शर्मा) जागा घेतली आहे. हा रोहितचा अनादर नसून ही जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे यात काही गैर नाही. 

नवज्योतसिंग सिद्धूंची क्रिकेट कारकीर्दमाजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १५ वर्षे चालली. १९८३ ते १९९८ पर्यंत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात सिद्धूंनी ५१ कसोटी आणि १३६ वन डे सामने खेळले. त्यांनी कसोटीत ३२०३ धावा आणि वन डे सामन्यात ४४१३ धावा केल्या. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी १५ शतके आणि ४८ अर्धशतकेही झळकावली आहेत.

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूआयपीएल २०२४रोहित शर्माहार्दिक पांड्या