Join us  

विराटला भिडणाऱ्या नवीनसह आणखी दोघांचं IPLमध्ये खेळणं कठीण; बोर्डाने घातली बंदी, कारण... 

आयपीएल हंगामाला सुरुवात होण्याआधीच लखनौ सुपर जाएंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाना मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:36 PM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी नुकताच मिनी लिलाव पार पडला. या लिलावात चांगले खेळाडू आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत अनेक संघांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. मात्र आयपीएल हंगामाला सुरुवात होण्याआधीच लखनौ सुपर जाएंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाना मोठा धक्का बसला आहे. कारण या संघांतील प्रत्येकी एका खेळाडूला आयपीएलमध्ये सहभागी होण्यापासून त्यांच्या क्रिकेट बोर्डाने बंदी घातली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला असून तीन अफगाणी खेळाडूंवर फ्रंचायझी क्रिकेटसाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

फ्रंचायझी क्रिकेटसाठी बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला भर मैदानात भिडणारा वेगवान गोलंदाज नवीन उल हक, फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि फझहलक फारुखी यांचा समावेश आहे. हे खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा वैयक्तिक हिताला जास्त प्राधान्य देत असल्याचं कारण पुढे करत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

नवीन उल हक, फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि फझहलक फारुखी यांचा अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यापेक्षा विविध देशांमध्ये चालणाऱ्या लीगमध्ये खेळण्याकडे ओढा होता. याच कारणातून तीनही खेळाडूंनी आपल्याला अफगाणिस्तान संघात सामील करण्याआधी कल्पना दिली जावी, आम्ही उपलब्ध आहोत की नाही, हे विचारात घेतलं जावं, अशी मागणी क्रिकेट बोर्डाकडे केली होती. 

दरम्यान, खेळाडूंच्या या मनमानीमुळे संतापलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन उल हक, फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि फझहलक फारुखी यांना फ्रंचायझी क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली असून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्यासदेखील स्थगिती दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३इंडियन प्रीमिअर लीगविराट कोहलीअफगाणिस्तान