Join us

नदालचा संघर्षपूर्ण विजय, इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत

रोममध्ये ९ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या नदालची यानंतरची लढत अलेक्सांद्र ज्वेरेवविरुद्ध होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 10:17 IST

Open in App

रोम : राफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आपला ३५ वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने २२ वर्षिय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना ३-६, ६-४, ७-६(३) विजय मिळवला.नदाल पहिला सेट गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ३-० ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने तिसऱ्या सेटमध्ये ६-५ च्या स्कोअरवर दोन मॅच पॉईंट वाचविले.रोममध्ये ९ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या नदालची यानंतरची लढत अलेक्सांद्र ज्वेरेवविरुद्ध होईल. ज्वेरवने येथे २०१७ मध्ये जेतेपद पटकावले होते. गेल्या आठवड्यात माद्रिद ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या ज्वेरवने शानदार पुनरागमन करताना केई निशिकोरीची झुंज ४-६, ६-३, ६-४ ने मोडून काढली.त्याआधी, अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने क्वालिफायर अलेजांद्रो डेविडोविच फोकिनाचा ६-२, ६-१ ने सहज पराभव केला.

महिला विभागात अव्वल मानांकित एश बार्टीने वेरोनिका कुदेरमोतोव्हाचा ६-३, ६-३ ने पराभव केला. आता तिला पुढच्या फेरीत अमेरिकेच्या कोको गॉच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गॉने आर्यना सबालेंकाचा ७-५, ६-३ ने पराभव केला. 

टॅग्स :टेनिसराफेल नदाल