- रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : “एमसीए माझा पुतळा उभारणार असल्याचे कळले आणि आश्चर्याचा धक्का बसला. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज मी जो काही आहे, तो मुंबई क्रिकेटमुळेच आहे. आजपर्यंत केलेल्या कार्याची ही मी पोचपावती समजतो,” असे भावनिक मत भारताचे आणि मुंबईचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बुधवारी आपल्या बैठकीत वेंगसरकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. हा पुतळा वानखेडे स्टेडियम परिसरातील एमसीए क्रिकेट संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या पुतळ्याशेजारीच उभारण्यात येईल, अशी माहिती ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.
‘एमसीए’च्या वतीने होणाऱ्या या सन्मानाविषयी वेंगसरकर यांनी सांगितले की, “मी वयाच्या १२व्या वर्षापासून गाईल्स आणि हॅरिश ढाल स्पर्धेत खेळलो. त्यानंतर मुंबई आणि भारताकडून अनेक वर्षे क्रिकेट खेळलो. खेळाडू आणि प्रशासक म्हणून सुमारे ४० वर्षे मी क्रिकेटची सेवा करीत आहे. आजही मी अनेक गुणवान खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देतो. हे सर्व करण्याची ताकद मला मुंबई क्रिकेटनेच दिली. त्यामुळे, माझ्या कार्याची ही पोचपावती आहे, असे मी समजतो. म्हणून, माझ्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे आणि यासाठी मी ‘एमसीए’चे आभार मानतो.”
हा पुतळा कोणत्या शैलीत आणि कधी बसविण्यात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. याआधी, वानखेडे स्टेडियममध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर यंदा ऑगस्ट महिन्यात गावसकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता.
शेतकऱ्यांसाठी १ कोटी
‘एमसीए’ने या बैठकीदरम्यान अनेक निर्णय घेतले असून, यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायक निधीला १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच, यामध्ये मुंबईचे क्रिकेटपटूही एकत्रितपणे २५ लाख रुपये मदत देणार असल्याची माहिती ‘एमसीए’ने दिली.