राजस्थान रॉयल्सचा युवा वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटला आश्चर्यचकित केले. अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षात त्याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. या कामगिरीबद्दल त्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे. त्याची फलंदाजी पाहून भल्याभल्या गोलदांजांच्या डोळ्यात पाणी आणणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियरर्सही आश्चर्यचकीत झाला आहे. एबी डिव्हिलियरर्सने त्याच्या मुलाची तुलना वैभव सूर्यवंशी याच्याशी करताना मोठे वक्तव्य केले आहे.
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, '१४ व्या वर्षी एवढी मोठी कामगिरी, मी त्याच्याबद्दल काय बोलू... प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, माझ्याकडे त्याच्याबद्दल शब्द नाहीत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मी त्याची फलंदाजी पाहिली. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल. माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि मला वाटत नाही की तो १४ व्या वर्षी इतक्या मोठ्या स्तरावर खेळू शकेल. नक्कीच हे संपूर्ण जगाला आश्चर्यचकीत करणारे आहे.'
'वैभव सूर्यवंशीची फलंदाजी आक्रमक आहे. तो वेगाने फलंदाजी करणार आहे. याआधी मी कधीच असे शतक पाहिले नाही. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याची फलंदाजी खूपच आक्रमक आहे, जी माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करू शकेल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता तो फक्त १४ वर्षाचा आहे. त्यामुळे अजून त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. १४ वर्षांच्या मुलाकडून तुम्हाला आणखी काय हवे आहे', असेही एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
पुढे एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, 'जागतिक क्रिकेटमध्ये, मला असे फलंदाज आवडतात जे परिस्थितीनुसार त्यांचे बॅटिंग गियर बदलतात. वैभवसाठी हे पाहणे मनोरंजक असेल. पहिल्या ६ षटकांमध्ये वैभव खूपच आक्रमक दिसत होता आणि त्यानंतर तो कसा फलंदाजी करतो हे पाहणे बाकी आहे. पण आशा आहे की वैभव खूप पुढे जाईल. मला वाटते की तो भविष्यासाठी बनलेला आहे. भविष्य त्याची वाट पाहत आहे.'