Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझी लेक मृत्युशी झुंजतेय, मदत करा!" महिलेने रोहित शर्मासमोर पसरला पदर, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Viral Video: इंदूरमधील हॉटेलमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला एका महिलेने अचानक गाठल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही सुरक्षेतील चूक वाटली, पण त्यामागील कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:33 IST

Open in App

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना एका महिलेने सुरक्षाकडे तोडून त्याला गाठले आणि त्याचा हात पकडला. या अनपेक्षित प्रकारामुळे रोहित शर्मासह तिथे उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून संबंधित महिलेने असे कृत्य का केले? त्यामागचे कारण ऐकून अनेकजण भरावून गेले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, रोहित शर्मा हॉटेलमध्ये जात असताना सरिता शर्मा नावाच्या महिलेने अचानक त्याच्याकडे धाव घेतली. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी तिने रोहितचा हात पकडला. सुरुवातीला ही घटना सुरक्षेतील त्रुटी असल्याचे वाटले, मात्र नंतर यामागील खरी कहाणी समोर आली. सरिता शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्याकडून जे काही घडले, ते प्रसिद्धीसाठी किंवा खेळाडूला त्रास देण्यासाठी नव्हते तर, मृत्युशी झुंजणाऱ्या आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक हताश प्रयत्न होता.

सरिता यांची मुलगी अनिका एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अमेरिकेतून इंजेक्शन मागवण्याची गरज आहे, ज्याची किंमत ९ कोटी रुपये आहे. सरिता आणि त्यांच्या कुटुंबाने आतापर्यंत लोकवर्गणीतून ४.१ कोटी रुपये जमा केले. परंतु, उर्वरित रक्कम गोळा करण्यासाठी वेळ कमी पडत आहे. "रोहित शर्मा आणि विराट कोहली गरजू मुलांना मदत करतात हे आम्हाला ठाऊक आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठीच मी हे पाऊल उचलले, हे त्यांनी समजून घ्यावे. मी माझ्या कृत्याबद्दल माफी मागते. आशा आहे की, ते मदत करतील", असे सरिता यांनी म्हटले.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या हॉटेलमधील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक अनोळखी व्यक्ती खेळाडूच्या इतक्या जवळ कशी पोहोचू शकते? यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र, दुसरीकडे सरिता शर्मा यांची परिस्थिती पाहून अनेकांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली असून, सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा भारतीय संघ व्यवस्थापनाकडून या घटनेवर अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, या घटनेनंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. एकीकडे खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची असली, तरी एका हताश आईने आपल्या मुलीच्या जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :रोहित शर्मासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ