एक्स्पर्ट कमेंट, अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
आयपीएल संघ कोलकाताने बीसीसीआयच्या निर्देशानुसार बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून रिलीज केले. या निर्णयात अनेक त्रुटी दिसून येतात. मुस्तफिजूरला हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने दबावाखाली घेतल्याचे स्पष्ट होते. बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारतात मोठा गदारोळ झाला. सोशल मीडियावर दबाव निर्माण झाला. वाद वाढू नये म्हणून बीसीसीआयने मुस्तफिजूरला वगळण्याचे कोलकाता संघाला निर्देश दिले.
संयम पाळायला हवा होता
बीसीसीआयने संयम दाखवला असता तर कदाचित अधिक चांगला तोडगा निघू शकला असता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या होणे अजिबात स्वीकारार्ह नाही. पण, जयशंकर आणि बांगलादेश सरकारमधील चर्चेचा निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करता आली असती.
दुहेरी निकष का?
एक मजेशीर बाब म्हणजे बांगलादेशचे खेळाडू जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतात आणि त्यातील अनेक लीगचे मालक आयपीएलचेच आहेत. जर बांगलादेशचे खेळाडू आयपीएल मालकांच्या संघांसाठी इतर लीगमध्ये खेळू शकतात, तर आयपीएलमध्ये का नाही?
शाहरुखच लक्ष्य का?
बीसीसीआयचा हा निर्णय अतिशय प्रतिक्रियावादी वाटतो. घटनेनंतर सोशल मीडियावर वातावरण तापले आणि बीसीसीआयच्या हालचाली सुरू झाल्या.
त्यातही कोलकाता संघाचा सहमालक अभिनेता शाहरुख खान याला लक्ष्य करण्यात आले. प्रश्न असा आहे की, शाहरुख खानच लक्ष्य का? आयपीएल लिलावात शाहरुख खान बसला नव्हता किंवा त्याने मुस्तफिजूरची निवडही केली नव्हती.
कोलकाताचे सहमालक जय मेहता आणि जूही चावलादेखील आहेत. पण, त्यांना का लक्ष्य करण्यात आले नाही? पण, शाहरुख खानला लक्ष्य करीत या प्रकरणाला सांप्रदायिक राजकारणाचा रंग दिला जात असल्याचे निष्पन्न होते.
पुढे काय होणार?
टी-२० विश्वचषकात बांगलादेश संघाला काही सामने कोलकात्यात खेळायचे आहेत, जिथे त्यांचे अनेक समर्थक असतील. बीसीसीआयची भूमिका काय असेल? अशा घटनांचा भारताच्या प्रतिमेवर काय परिणाम होत आहे? जगाला यातून जो संदेश जात आहे तो सकारात्मक नाही.
खेळ राजकारणापासून दूर ठेवा
राजकीय प्रश्नांचा खेळात हस्तक्षेप होऊ नये, असा दृष्टिकोन असायला हवा. असे न झाल्यास भविष्यात असेच प्रश्न हॉकी, ऑलिम्पिकमध्येही उभे राहू शकतात.
समस्या सोडविण्यावर भर असावा, ती गुंतागुंतीची करण्यावर नाही. एखाद्या खेळाडूला संघातून वगळण्यासारखे निर्देश हा शेवटचा पर्याय असायला हवा.