Join us  

मुरली विजयने घेतली निवृत्ती

Murali Vijay: गेल्या अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज मुरली विजय याने अखेर सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 6:52 AM

Open in App

चेन्नई : गेल्या अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज मुरली विजय याने अखेर सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. काही दिवसांपूर्वीच विजयने भारतीय संघासाठी आपला विचार होत नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावेळी, त्याने आता मला विदेशात क्रिकेट खेळण्यासाठी संधी शोधावी लागेल, असेही म्हटले होते. 

विजयने भारताकडून ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर २०१८ मध्ये पर्थ येथे अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच २००८-०९ मध्ये गौतम गंभीरचा पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच, २०१९ मध्ये विजय तामिळनाडूकडून अखेरचा प्रथम श्रेणी आणि अ श्रेणी क्रिकेट सामना खेळला होता. २०२० मध्ये तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळला होता.

विजयने ट्विटरवर निवृत्ती जाहीर करताना म्हटले की, ‘मी नम्रपणे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे जाहीर करतो. क्रिकेटविश्वात आणि या खेळाशी जुळलेल्या अनेक व्यवसायांमध्ये नव्या संधी शोधण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यामुळे मी सर्वांत जास्त प्रेम करत असलेल्या क्रिकेट खेळामध्ये खेळत राहीन.  माझ्यामते, एक क्रिकेटपटू म्हणून माझ्या प्रवासातील हे एक पुढील पाऊल ठरेल. माझ्या आयुष्यातील नव्या अध्यायाची मला प्रतीक्षा आहे.’ 

विजयने सर्वांचे धन्यवाद मानताना म्हटले की, ‘मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), टीएनसीए (तामिळनाडू क्रिकेट संघटन),  चेन्नई सुपरकिंग्ज यांचे त्यांनी दिलेल्या संधीसाठी आभार मानतो. माझ्या संघातील सर्व सहकारी, कोचिंग स्टाफ सदस्य, मेंटर्स आणि सहयोगी स्टाफ यांनी माझे स्वप्न साकारण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांचेही आभार मानतो. तुम्हा सर्वांसोबत खेळणे, माझ्यासाठी अभिमानास्पद ठरले.’ त्याचप्रमाणे, ‘चाहत्यांसोबत व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणांना मी आठवणीत ठेवेन आणि तुम्ही दिलेला पाठिंबा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरला आहे. अखेरीस मी, माझे कुटुंबीय आणि माझे मित्र यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्याविना मी हे यश मिळवू शकलो नसतो,’ असेही विजयने म्हटले. 

मुरली विजयची कारकीर्द  कसोटी - सामने : ६१, धावा : ३९८२, शतके/अर्धशतके : १२/१, सर्वोच्च : १६७ एकदिवसीय - सामने : १७, धावा : ३३९, अर्धशतक : १, सर्वोच्च : ७२ टी-२० : सामने : ९, धावा : १६९, अर्धशतक : ०, सर्वोच्च : ४८ आयपीएल : सामने : १०६, धावा : २६१९, शतके/अर्धशतके : २/१३,  सर्वोच्च : १२७ 

टॅग्स :मुरली विजयभारतीय क्रिकेट संघ
Open in App