लंडन : इंग्लंड दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला अपयशाचा सामना करावा लागला. गोलंदाज वगळले तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडूंना अपयश आले. विशेषतः सलामीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांनी घोर निराशा केली. मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना संधीचं सोनं करता आले नाही. यापैकी एक खेळाडू इंग्लंडमध्ये मात्र खोऱ्याने धावा कुटत आहे.
इंग्लंड दौऱ्यात विजयला चार डावांत मिळून 26 धावा करता आल्या. लॉर्ड्स कसोटीत त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याला उर्वरित मालिकेत संघातून वगळण्यात आले. संघातून वगळल्यानंतर विजयने इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील एसेक्स क्लबकडून खेळताना खोऱ्याने धावा करत आहे. मंगळवारी त्याने सरे क्लबविरुद्ध 80 धावांची खेळी केली. कौंटी क्रिकेटमधील त्याचे हे सलग चौथे अर्धशतक आहे.
विजयने चार डावांत 80.25 च्या सरासरीने एकूण 321 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा ( 56, 85 व 80 ) समावेश आहे.
https://www.ecb.co.uk/county-championship/match-centre#videos