धर्मशाळा : बलाढ्य मुंबईने आपल्या लौकिकासह खेळ करताना एकतर्फी झालेल्या सामन्यात पंजाबचा एक
डाव आणि ५० धावांनी सहजपणे पराभव केला. या दिमाखदार विजयासह मुंबईने १६ वर्षांखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि मुंबईचा संकटमोचक सिध्देश लाड यांचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांनी दिमाखदार खेळ केला.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून मुंबई कर्णधार आयुष जेठवाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविताना पंजाबला ६४.५ षटकांत १४२ धावांत गुंडाळले. मुशीर खानने भेदक मारा करत ४२ धावांत ५ बळी घेतले. पंजाबकडून सलामीवीर शिवेन रखेजा (४३) याने संयमी खेळी केली.
यानंतर मुंबईने १२१.२ षटकात सर्वबाद ३४३ धावा फटकावताना २०१ धावांची आघाडी घेतली. मधली फळी कोलमडल्यानंतर आदित्य पवारने १७९ चेंडूंत १२ चौकारांसह ८६ धावा केल्या. सलामीवीर स्वयम डब्ल्यू. यानेही १७६ चेंडूत १२ चौकारांसह ६४ धावा केल्या. अनुराग सिंग (४६) व प्रिन्स बदियानी (४९) यांनी मुंबईचा खडूसपणा दाखवत चिवट खेळी केली.
दुसऱ्या डाव ६१ षटकांत १५१ धावांमध्ये कोलमडला. पुन्हा एकदा मुशीरने ५९ धावांत अर्धा संघ बाद करुन सामन्यात १० बळी घेतले. आयुष जेठवानेही ३ बळी घेतले. पंजाबकडून आदित्य (३९*) व जसकिरत सिंग (३६) यांनी झुंज दिली. ‘मुलांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी माझ्यावर प्रशिक्षक म्हणून दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे,’ असे प्रशिक्षक लाड म्हणाले.