श्रीनगर : बलाढ्य मुंबईचा संघ अडचणीत आल्यानंतर पुन्हा एकदा संकटमोचक सिद्धेश लाड धावून आला आणि मोक्याच्या वेळी त्याने शतक ठोकले. सिद्धेशच्या या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात बुधवारी पहिल्या दिवसअखेर ८३ षटकांत ५ बाद ३३६ धावा अशी मजल मारली.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईची २३व्या षटकात ३ बाद ७४ धावा अशी अवस्था झाली होती. येथून सिद्धेशने मुंबईला सावरताना सर्फराझ खानसोबत चौथ्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने मुंबईला भक्कम स्थितीत आणताना शम्स मुलानीसोबत पाचव्या गड्यासाठी १५९ धावांची जबरदस्त भागीदारी केली. सिद्धेशने १५६ चेंडूंत १७ चौकार व ३ षटकारांसह ११६ धावा केल्या.
दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, शम्स १२५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ७९, तर यष्टिरक्षक-फलंदाज आकाश आनंद ४९ चेंडूंत २ चौकारांसह १५ धावांवर खेळत होते. युधविर सिंगने ८२ धावांत २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८३ षटकांत ५ बाद ३३६ धावा (सिद्धेश लाड ११६, शम्स मुलानी खेळत आहे ७९, सर्फराझ खान ४२, आकाश आनंद खेळत आहे १५; युधविर सिंग २/८२.)