औरंगाबाद - मुंबईची उगवती महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स हिने अवघ्या 163 चेंडूत द्विशतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. मुंबईच्या 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या जेमिमा हिने सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीती 163 चेंडूत नाबाद 202 धावा केल्या.
या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजीस सुरुवात केल्यावर जेमिमा हिने चौकारांची बरसात केली. तिने 52 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर 83 चेंडूत शतकाला गवसणी घातली. आक्रमक पवित्रा घेतलेल्या जेमिमाने 116 चेंडूतच दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. अखेर 163 चेंडूत तिने द्विशतकी मजल मारली. जेमिमाच्या या आक्रमक खेळीमुळे मुंबईला 347 धावांचे महाकाय आव्हान उभे करता आले. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव 62 धावांत गुंडाळून मुंबईने या लढतीत 285 धावांनी विजय मिळवला.