मुंबई : नॅट स्किव्हर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईचा संघ शनिवारी डब्ल्यूपीएलमध्ये दुसऱ्यांदा जेतेपद उंचावण्यास सज्ज झाला आहे. त्याचवेळी, दिल्लीचा संघही पहिल्या विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल.
स्किव्हर ब्रंट (४९३ धावा, ९ बळी) आणि मॅथ्यूज (१७ बळी, ३०४ धावा) दोघीही अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. जर या दोघींनी शानदार कामगिरी कायम राखली, तर मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वाखालील दिल्लीला पहिले विजेतेपद पटकावणे सोपे जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली मेग लॅनिंग महिला क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ती आणि तिचा संघ पहिले डब्ल्यूपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. दिल्लीचा पुरुष संघही आतापर्यंत आयपीएल जिंकण्यास अपयशी ठरलेला आहे.
मुंबईला ब्रेबाॅर्न स्टेडियममधील स्थितीची चांगली माहिती आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मुंबईची फलंदाजी तगडी आहे. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कर्णधार हरमनप्रीत कौर पुन्हा फाॅर्मात येणे, हा मुंबईसाठी चांगला संकेत आहे. स्किव्हर ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी आतापर्यंत गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी केली आहे. याशिवाय मुंबईची अमेलिया केर शानदार फाॅर्मात असून, तिने आतापर्यंत १६ बळी घेतले आहेत.
दिल्लीला नकोय हॅट् ट्रिक
दिल्ली संघाने डब्ल्यूपीएलमध्ये पहिल्या सत्रापासून सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. मात्र, असे असले तरी त्यांना आतापर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात २०२३ साली मुंबईने बाजी मारताना अंतिम फेरीत दिल्लीला ७ बळींनी नमवले होते.
२०२४ साली अंतिम फेरीत दिल्लीला बंगळुरूविरूद्ध ८ बळींनी पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता उपविजेतेपदाची हॅटट्रिक न नोंदवता पहिल्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी दिल्ली संघाने कंबर कसली आहे.
शेफाली, लॅनिंग, प्रसाद यांच्याकडे लक्ष
दिल्लीकडून शेफाली वर्मा (३०० धावा) हिची पॉवर प्लेमधील फलंदाजी महत्त्वाची असेल. लॅनिंगही चांगली फलंदाजी करत असून, तिने आतापर्यंत २६३ धावा केल्या आहेत. निकी प्रसाद हिनेही संधी मिळाल्यावर दमदार फलंदाजी केली आहे.
जेस जोनासन, शिखा पांडे फाॅर्मात
दिल्लीकडून फिरकीपटू जेस जोनासन आणि भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या दोघींनी प्रत्येकी ११ बळी घेतले आहेत. या दोघींच्या कामगिरीमुळे दिल्लीने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईला ९ बाद १२३ धावांवर रोखले होते. मुंबईच्या फलंदाजांना या दोघींपासून सावध राहावे लागणार आहे.
सामन्याचे स्थळ- ब्रेबाॅर्न स्टेडियम.सामन्याची वेळ- सायंकाळी ७:३० वाजल्यापासूनथेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स-१८, लाईव्ह स्ट्रीमिंग, जिओ हॉटस्टार