Join us  

...तर IPL मध्ये मुंबईच्या मुलांना येतील 'अच्छे दिन'; गावस्करांनी सुचवला रामबाण उपाय

ट्वेंटी-20 मुंबई लीगच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा सोमवारी करण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 3:14 PM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय संघाला अनेक उगवते तारे दिले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी आयपीएल हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. पण, या लीगमध्ये मुंबईचा टक्का फार कमी दिसत असल्याची खंत भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. ट्वेंटी-20 मुंबई लीगच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा सोमवारी करण्यात आली. यावेळी गावस्करांनी आयपीएलमधील मुंबईच्या खेळाडूंची संख्या वाढवण्यासाठी एक उपाय सुचवला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनेही गावस्करांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली.14 ते 26 मार्च या कालावधीत ट्वेंटी-20 मुंबई लीगचे दुसरे पर्व खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या या लीगमध्ये संघ संख्या दोनने वाढवण्यात आली आहे. यंदा लीगमध्ये आठ संघ खेळणार असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. गावस्कर म्हणाले,''इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबईच्या खेळाडूंची संख्या असमाधानकारक आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईसाठी ही शोकांतिका म्हणावी लागेल. या उलट पंजाबचे 15-16 खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. ही गोष्ट विचारात घेता आयपीएल लिलावाच्या आधी मुंबई ट्वेंटी-20 लीग खेळवण्यात यावी. जेणेकरून मुंबईच्या खेळाडूंची दखल घेतली जाईल.''यावेळी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मुंबईची पिछेहाट होत असल्याचेही गावस्करांनी सांगितले. पण, हे चित्र भविष्यात बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ''ट्वेंटी-20 मुंबई लीग ही देशातील अन्य राज्यांतील सर्वात यशस्वी लीग आहे. या लीगमधून शिवम दुबे, सुर्यकुमार यादव असे खेळाडू आयपीएलला दिले आहेत. भविष्यात नावांची ही यादी आणखी वाढलेली पाहायला मिळेल. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून मुंबईचे खेळाडू ट्वेंटी-20 मुंबई लीगमध्ये दमदार कामगिरीसाठी प्रयत्नशील असतील,'' असे गावस्करांनी सांगितले.तेंडुलकरनेही ट्वेंटी-20 मुंबई लीगच्या यशाची प्रशंसा केली. तो म्हणाला,''यंदा या लीगमध्ये दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे. या लीगचे यश पाहता भविष्यात देशभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळण्याचा आग्रह धरतील.'' 

ट्वेंटी-20 मुंबई लीग

  • 14 ते 26 मे 2019
  • 8 संघांमध्ये 13 दिवसांत होणार 23 सामने 
  • सहभागी संघआकाश टायगर्स MWS, ट्रिंप नाईट MNE, ईगल ठाणे स्ट्राईकर्स, नॉर्थ मुंबई पँथर्स, सोबो सुपरसॉनिक, शिवाजी पार्क लायन्स, नमोबांद्रा ब्लास्टर, ARCS अंधेरी
  • थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 1 मराठी
टॅग्स :सुनील गावसकरटी-20 क्रिकेटमुंबई