Join us  

IPL मध्ये नाव नसलं म्हणून काय झालं, वडिलांनी सांगितलंय देशासाठी खेळायचं - मुशीर खान

Musheer Khan IPL: आयपीएलमध्ये खेळावं ही जगातील प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 5:49 PM

Open in App

आयपीएलमध्ये खेळावं ही जगातील प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. पण, रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात चमकणारा मुंबईकर मुशीर खानला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. असं असताना देखील त्यानं समाधान व्यक्त करत मन जिंकणारं विधान केलं. गुरुवारी विदर्भला नमवून मुंबई क्रिकेट संघानं ४२ व्यांदा रणजी करंडक उंचावला. मुंबईच्या या विजयात मुशीर खानची मोलाची भूमिका राहिली. त्यानं अंतिम सामन्यात शतकी खेळीशिवाय गोलंदाजीत देखील कमाल केली. 

मुशीर खानला आयपीएलच्या लिलावात एकही खरेदीदार मिळाला. त्याच्यावर एकाही फ्रँचायझीनं बोली न लावल्यानं तो अनसोल्ड राहिला. पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करून त्यानं आपल्या खेळीची दखल घेण्यास भाग पाडलं. मुशीरनं (१९ वर्ष) रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. मुंबईसाठी अंतिम सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरूण खेळाडू होण्याचा मान मुशीर खाननं पटकावला. 

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना मुशीर खाननं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तो म्हणाला की, माझं नाव आयपीएलमध्ये नाही... परंतु मी अजिबात निराश नाही. माझ्या वडिलांनी कसोटी क्रिकेट आणि टीम इंडियासाठी खेळायचं असं सांगितलं आहे. आयपीएलमध्ये नंतर देखील खेळता येऊ शकतं... आज नाही तर उद्या.

'शतक'वीर मुशीर 

मुशीर खाननं आणखी सांगितलं की, आयपीएलची तयारी करण्यासाठी मला आणखी एक वर्ष मिळालं याचा आनंद आहे. मी आता ट्वेंटी-२० क्रिकेटची तयारी करेन. नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात मुशीरनं दुसऱ्या डावात १३६ धावा करून विदर्भसमोर ५३८ धावांचं तगडं लक्ष्य उभारण्यात हातभार लावला. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भचा संघ अपयशी ठरला अन् अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईनं १६९ धावांनी विजय मिळवला. मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खाननं अलीकडेच इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केलं. 

टॅग्स :रणजी करंडकसर्फराज खानमुंबईआयपीएल २०२४