Join us  

मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना दिली चार दिवसांची विश्रांती

आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचा निर्णय काही संघांनी घेतला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 6:52 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचा निर्णय काही संघांनी घेतला आहे. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघातील खेळाडूंना चार दिवसांची विश्रांती दिली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 26 एप्रिलला होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्स हे एकमेकांना भिडतील. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापकीय चमूनं भारताच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना विश्रांती दिली आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी IANSला सांगितले की,''खेळाडूंना आम्ही प्राधान्य दिलेले आहे. त्यांना आम्ही क्रिकेटपासून थोडा वेळ दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या चार दिवसांत त्यांनी पुरेपूर विश्रांती घ्यावी असा आमचा सल्ला आहे. केवळ रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह किंवा हार्दिक पांड्याच नव्हे तर अन्य संघांकडून वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्यावर असणाऱ्या कामाचा ताण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.''

चेन्नई सुपर किंग्सनंतर वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना विश्रांती देणारा मुंबई इंडियन्स हा दुसरा संघ आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित, जसप्रीत आणि हार्दिक हे तीन वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारे खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये हार्दिकने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे, तर रोहित व बुमराहला अद्याप सूर गवसलेला नाही.   

टॅग्स :आयपीएल 2019वर्ल्ड कप २०१९मुंबई इंडियन्सरोहित शर्माजसप्रित बुमराहहार्दिक पांड्या