मुंबई : सलग दोन पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स शनिवारी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल. विशेष म्हणजे दिल्लीनेही अद्याप गुणांचे खाते उघडले नसल्याने दोन्ही संघ यंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवण्यासाठी त्वेषाने खेळतील.मुंबईकरांनी आपले पहिले दोन सामने मोक्याच्यावेळी गमावले. विजयी स्थितीमध्ये असताना केलेली चुक निर्णायक ठरल्याने मुंबईला सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, दिल्लीकरांना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला आहे. मुंबईसाठी फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. कर्णधार रोहित शर्मा, एल्विन लेविस, किएरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन असे स्टार फलंदाज असतानाही मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रहमान असे डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज असतानाही मुंबईला अखेरच्या क्षणी दोन्ही सामने गमवावे लागले. दरम्यान हुकमी अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी असल्याचा फटका मुंबईला हैदराबादविरुद्ध बसला. त्याची तंदुरुस्ती मुंबईसाठी महत्त्वाची आहे.दुसरीकडे, दिल्लीच्या फलंदाजांनीही आपल्या क्षमतेनुसार खेळी केलेली नाही. श्रेयस अय्यर, कर्णधार गौतम गंभीर, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय आणि कॉलिन मुन्रो असे धडाकेबाज फलंदाज दिल्लीकडे आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राच्या नेतृत्वामध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईला मर्यादित धावसंख्येत रोखावे लागेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार
मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार
सलग दोन पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स शनिवारी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:50 IST