लाहोर कलंदर्सनी सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीग जिंकली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या गद्दाफी स्टेडिअमवरील रोमांचक सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत चुरस रंगली होती. अखेरच्या चेंडूवर ४ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदीच्या संघाने मुल्तान सुल्तांसवर विजय मिळविला आहे. लाहोरच्या विजयाचा हिरो आफ्रिदी राहिला. त्याने अष्टपैलू कामगिरी केल्याने संघाला विजय मिळाला आहे.
शाहिन आफ्रिदीने नाबाद ४४ रन्स बनविले, तर गोलंदाजी करताना चार विकेट घेतले. गेल्या वर्षी देखील याच दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. शाहीनला प्लेअर ऑफ दी मॅच आणि इहसानुल्लाहला प्लेयर ऑफ द सीरीज देण्यात आला.
पीएसएलच्या फायनलमध्ये शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मुल्तानला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. खुशदिल शाह आणि अब्बास आफ्रीदीने मिळून हारिस रौफच्या १९ व्या षटकात २२ रन्स चोपले. परंतू, जमान खानच्या शेवटच्या षटकात १३ रन्स बनविता आले नाहीत. अखेरच्या चेंडूवर चौकाराची गरज होती. परंतू. दोनच रन्स बनविता आले आणि लाहोरने १ रन्सने सामना जिंकला.
लाहोर कलंदर्सने टॉस जिंकला होता. सुरुवातीला पहिल्या विकेटसाठी ३८ रन्सची पार्टनरशीप झाली. दुसऱ्या विकेटसाठी ५८ रन्सची पार्टनरशीप झाली. परंतू, नंतर डाव गडगडला आणि १५ ओव्हरला ११२ वर ५ विकेट अशी अवस्था झाली होती. शाहीन आफ्रिदीने सुत्रे आपल्या हाती घेत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ रन्स ठोकले आणि लाहोरला २०० वर नेऊन ठेवले.
अंतिम सामन्याची धावसंख्या:
लाहोर कलंदर: 200/6 (अब्दुल्ला शफीक 65, शाहीन आफ्रिदी 44*, उस्मान मीर - तीन विकेट)
मुलतान सुलतान: 199/8 (रिले रोसो 52, शाहीन आफ्रिदी - चार विकेट)
पाकिस्तान सुपर लीग विजेते (आतापर्यंत):
2016- इस्लामाबाद युनायटेड
2017- पेशावर झल्मी
2018- इस्लामाबाद युनायटेड
2019- क्वेटा ग्लॅडिएटर्स
2020- कराची किंग्ज
2021- मुलतान सुलतान
2022- लाहोर कलंदर्स
2023- लाहोर कलंदर्स