ईडन गार्डन्सवर काल (९ एप्रिल २०२६) खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक मात केली. शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना लखनौचा युवा फलंदाज मुकल चौधरीने दोन गगनभेदी षटकार मारून संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. सध्या सोशल मीडियावर लखनौच्या विजयापेक्षा मुकुलच्या शेवटच्या षटकाराची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. मुकुलने ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर मारलेला षटकार पाहून सर्वजण थक्क झाले. डगआऊटमध्ये बसलेले लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी देखील उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मुकुलचे कौतुक केले.
शेवटच्या षटकात लखनौच्या संघाला विजयासाठी १४ धावांची गरत होती. क्रीजवर मुकुल चौधरी आणि आवेश खान होते. तर, केकेआरने वैभव अरोरा शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली. या षटकातील पहिल्या चेंडूवर आवेश खानने एक धाव काढून मुकुलला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर मुकुलने षटकार ठोकून विजयाचे अंतर कमी केले. तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव टाकून वैभव अरोराने केकेआरच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर मुकुलने पाचव्या चेंडूवर स्वीपर कव्हरच्या वरून अनोखा षटकार मारला. मुकुलच्या या षटकाराने सामना लखनौच्या बाजूने झुकला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत मुकुलने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची सर्वत्र चर्चा
मुकुल चौधरीचा तो ऑफ-स्टंप बाहेरील चेंडूवर मारलेला षटकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. लखनौचे मालक संजीव गोयंका देखील अवाक झाले आणि त्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मुकुलचे कौतुक केले. मुकुलच्या या षटकाराची क्रीडाविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी मुकुलच्या या षटकाराला क्रिएटीव्ह शॉट म्हटले आहे. कमी धावांच्या या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांच्या काळजाचे ठोके वाढवले, पण शेवटी मुकुल चौधरीच्या दमदार फटकेबाजीमुळे लखनौने विजयाची गुढी उभारली.
मुकुल चौधरीचा विक्रम
या सामन्यात मुकुल चौधरीने केवळ २७ चेंडूंमध्ये ५४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि तब्बल ७ षटकार लगावले. या खेळीसह त्याने दोन महत्त्वाचे विक्रम आपल्या नावे केले. आयपीएलच्या इतिहासात सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मुकुलने नोंदवला. मुकुल चौधरी आणि आवेश खान यांनी आठव्या विकेटसाठी ५४ धावांची नाबाद भागीदारी केली, जो एक नवा विक्रम आहे.