MS Dhoni IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी अजून खूप उशीर आहे. त्याआधी होणाऱ्या लिलावासाठी रिटेन रिलीजच्या खेळातील काय घडणार या गोष्टीची चर्चा रंगत असताना महेंद्रसिंह धोनीसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही हंगामापासून MS धोनी मैदानात उतरला की, तो पुढच्या हंगामात खेळणार का? हा प्रश्न चर्चेचा मुद्दा राहिला. चेन्नईचा संघ आगामी हंगामासाठी संघ बांधणी करताना काय डाव खेळणार? ही चर्चा रंगत असताना महेंद्रसिंह धोनी पुन्हा मैदानासाठी उतरण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी यासंदर्भातील गोष्ट स्पष्ट केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK च्या CEO च्या वक्तव्यामुळे चित्र झालं स्पष्ट
क्रिकबझच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनीनं वैयक्तिकरित्या पुढच्या हंगामात खेळण्यास उपलब्ध असेन, ही गोष्ट शेअर केली आहे, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे चेन्नई सुपर किंग्जनं अधिकृतरित्या महेंद्रसिंह धोनी आगामी हंगामासाठी मैदानात उतरण्याची अधिकृत पुष्टी करणारे आहे.
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
धोनीसाठी हा शेवटचा हंगाम ठरू शकतो
गत हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने महेंद्रसिंह धोनीला संघात कायम ठेवले होते. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यावर महेंद्रसिंह धोनीनं संघाचे नेतृत्व केले. पण आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील CSK चा संघ सगळ्यात तळाला राहिला. धोनी ४४ वर्षांचा असून यंदाचा हंगाम त्याच्यासाठी शेवटचा ठरू शकतो. आतापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून २४८ सामने खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३) पाचवेळा त्याच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली होती. धोनी CSK कडून १७ व्या आणि IPL मधील १९ व्या हंगामात पुन्हा मैदानात उतरेल.
CSK च्या संजू सॅमसनवरही आहेत नजरा
आगामी हंगामासाठी मजबूत संघबांधणी करण्याची रणनिती आखण्यासाठी १० आणि ११ नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्ज संघाची खास बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सीईओ विश्वनाथन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यासह महेंद्रसिंह धोनीही सहभागी असेल, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत संजू सॅमसन याला संघात घेण्यासाठी चर्चा होणं अपेक्षित आहे.