IPL 2024, Sanjiv Goenka vs MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील कालची लढत ही कमालीची राहिली... लखनौ सुपर जायंट्सने समोर ठेवलेले १६६ धावांचे लक्ष्य सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत सहज पार केले. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी LSG च्या गोलंदाजांना पार हैराण करून सोडले. नेमका चेंडू टाकावा तरी कसा, हेच त्यांना सुचेनासे झाले होते. हेड व शर्मा मैदानाच्या सर्व कोपऱ्यांवर सहजतेने चेंडू पोहोचवत होते. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या. या बेक्कार धुलाईनंतर LSG चा कर्णधार लोकेश राहुल अपसेट होताच, त्यात संघ मालक संजीव गोएंका यांनी त्याला झाप झाप झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला.
MS Dhoni vs Goenka?आयपीएलचा इतिहास पाहिलात तर
महेंद्रसिंग धोनीलाही रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरून याच संघ मालकाने अचानक हटवले होते. धोनीची कामगिरी खराब असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितले होते. २०१६ च्या आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट्सला शेवटून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते आणि २०१७च्या सुरुवातीला फ्रँचायझीने स्टीव्ह स्मिथला कर्णधार केले. तेव्हा संजिव गोएंका यांनी म्हटले होती की, आम्हाला युवा आणि जो संघात लिडर म्हणून फिट बसेल असा खेळाडू हवा होता. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी तिच्या पतीच्या बचावासाठी आली होती. तिने तसे ट्विटही केले होते.