ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत समावेश नाहीमैदानाबाहेर धोनीचा दबदबा कायम, सचिन-विराटा टाकले मागेभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-20 सामना आज
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सर्व महत्त्वांच्या स्पर्धांचे जेतेपद पटकावणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. मात्र, सध्या तो भारतीय संघाचा सदस्य नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड केलेली नाही. तरीही त्याचे असंख्य फॅन फॉलोअर्स आहेत. त्यात किंचितही घट झालेली नाही. YouGov Influencer Index 2018 च्या सर्व्हेनुसार मैदानाबाहेरही धोनीचा प्रभाव कायम असल्याचे दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावशाली सेलिब्रिटींमध्ये धोनीने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.
YouGov Influencer Index 2018च्या सर्व्हेत बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील 60 अव्वल सेलिब्रिटींबाबत चाचणी करण्यात आली. यासाठी त्यांनी ऑनलाईन मत मागवली होती. त्यांच्या या सर्व्हेत बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन अव्वल स्थानावर आहे. नुकतीच रणवीर सिंगसह लग्नाच्या रेशीम गाठीत अडकलेली दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महान फलंदाज तेंडुलकर आणि कोहली अनुक्रमे चौथ्या व सहाव्या स्थानी आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, आमीर खान आणि शाहरूख खान अनुक्रमे पाचव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहे.