चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर आहे. आयपीएलमध्ये आज चेन्नईचा संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. हा सामना धोनीच्या टी-२० कारकिर्दीतील ४०० सामना असेल. टी-२० क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्यापेक्षा सामने खेळणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरेल. या कामगिरीसह धोनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्यासारख्या खेळाडूंच्या एलिट लिस्टमध्ये सामील होणार आहे. धोनीने आतापर्यंत एकूण ३९९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २८ अर्धशतकांसह ७ हजार ५६६ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण ४५६ टी-२० सामने खेळले आहेत. दिनेश कार्तिक ४१२ टी-२० सामन्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत ४०७ टी-२० सामने खेळले आहेत. या यादीत धोनीच्या नावाचा समावेश होणार आहे.
धोनीने सर्वाधिक टी-२० सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. आयपीएलमध्ये धोनीने एकूण २७२ सामने खेळले आहेत, ज्यात १३७.८७ च्या स्ट्राइक रेटने ५ हजार ३७७ धावा केल्या आहेत. यातील २६६ सामने धोनीने सीएसकेसाठी खेळले आहेत. तर, दोन हंगामात त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले. रोहित शर्मासह आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. धोनीने एकूण ९८ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १२६ च्या स्ट्राईक रेटने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे. सीएसकेचा सर्वोत्तम फलंदाज रुतुराज गायकवाडला झालेल्या दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत आणखी भर पडली. सीएसकेची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे.